महान्यूज : आजची गझल
लाख अडचणी असून जगतो गरीब येथे
आयुष्याशी सदैव लढतो गरीब येथे
………………….◆★★★◆………………
काडी लावून गंमत बघती थोर मंडळी
दंगलीमधे केवळ मरतो गरीब येथे
………………….◆★★★◆………………
जाणत कसतो हक्क आपले, कर्तव्येही
तरी नेहमी शून्यच असतो गरीब येथे
………………….◆★★★◆………………
पैसा असणे हीच पात्रता मान्य जगाला
निकषांवर या कधी उतरतो गरीब येथे?
………………….◆★★★◆………………
घास तयाच्या हक्काचाही हिसकुन घेती
जाणतो तरी निमूट बघतो गरीब येथे
………………….◆★★★◆………………
घाम मिसळतो पिठात तेव्हा भाकर बनते
पोटासाठी सदैव पळतो गरीब येथे
………………….◆★★★◆………………
श्रीमंतांचे काय मला ते ठाउक नाही
कधी मनाने गरीब नसतो गरीब येथे
………………….◆★★★◆………………
दारिद्र्याची आग कुणाला नकोच असते
इलाज नसतो म्हणून जळतो गरीब येथे!
………………….◆★★★◆………………
गझलकार : रघुनाथ पाटील, जळगाव, हल्ली मुक्काम, पिंपरी चिंचवड
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











