इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मागील वर्षीचा हंगाम संपून आता दुसऱ्या वर्षीचा हंगाम सुरू होण्याचा काळ आला तरी अधिकचे पैसे सोडा, उसाची निर्धारीत एफआरपीदेखील पूर्णपणे इंदापूर तालुक्यातील छत्रपती व कर्मयोगी कारखान्यांनी दिली नाही. दोन्ही कारखाने राष्ट्रवादी व भाजपच्या ताब्यात आहेत, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे द्यायचे सोडून राजकारण करण्यात दंग असलेल्यांना येणाऱ्या हंगामाचा गाळप परवाना देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तर भाजपच्याच किसान युवा मोर्चाने साखर आयुक्तांकडे दोन दिवसांपूर्वी मागणी करून व्याजासह प्रलंबित एफआरपी देण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश काढावा अशी मागणी केली आहे.
राज्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपी पूर्णपणे अद्यापही दिलेली नाही. त्यात इंदापूर तालुक्यातील दोन सहकारी कारखाने आहेत. या कारखान्यांनी देखील अजून पूर्ण एफआरपी दिलेली नाही. शेजारच्या माळेगाव व सोमेश्वर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम ऊस उत्पादकांना दिली, त्यावर निवडणूकांमध्ये चर्चाही झाली, मात्र तरीदेखील ऊस उत्पादकांच्या घामाचा पैसा वेळेत देण्याचे दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या ध्यानात आले नाही.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते व कन्हेरीचे सरपंच व शिवसेनेचे नेते सतीश काटे यांनी इंदापूर तालुक्यातील दोन्ही कारखान्यांनी तातडीने एफआरपी व्याजासह देण्याची मागणी केली आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याने अजूनही प्रलंबित एफआरपी दिलेली नाही, ती व्याजासह द्यावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यापूर्वीच शेतकरी संघटनेने दिला असून छत्रपती कारखाना देखील सभासदांचा संयम पाहत असल्याची टिका रायते व काटे यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात अगोदरच शेतकऱ्यांचे दिवस खराब आले असतानाच आता वर्ष-वर्ष पैसे रखडवून ठेवले जात आहेत. पुरवठादारांचे, तोडणी वाहतूकदारांचे पैसे वेळेत दिले जातात, त्यांची भीती वाटते आणि ऊस उत्पादकांची भीती वाटत नाही म्हणूनच हा सारा विलंब असल्याची टिका या दोघांनी केली आहे.
साखर आयुक्तालयाकडे तक्रार
आता रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना निवेदन दिले असून यामध्ये हंगाम २०२०-२१ रेव्हेन्यू शेअरिंग फार्म्युला लागू करण्यासाठी समिती स्थापन करावी, सन २०१९-२० ची एफआरपी रक्कम न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन साखर आयुक्तांना दिले आहे. जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले आहे.
भाजपच्या किसान मोर्चानेही उडी घेतली
भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाने गळीत हंगामापूर्वी मागील हंगामातील एफआरपी व्याजासह ऊस उत्पादकांना परत केली पाहिजे अशी मागणी केली आहे. जर ही अंमलबजावणी झाली नाही, तर प्रदेशाध्यक्ष माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयास टाळे ठोकू असा इशाराही या शिष्टमंडळाने दिला. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, अॅड. धर्मेंद्र खांडरे, माऊली शेळके, माऊली चवरे, संजय घुंडरे, केशव कामठे, बाळासाहेब खळदकर आदींचा समावेश होता.










