इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वेळ सकाळी साडेअकराची… मराठा आंदोलक पोलिसांचे बॅरीकेट काढून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवासस्थानासमोर आले…आणि त्यानंतर काही वेळातच भरणे आंदोलकांना सामोरे आले.. पवन घोगरे या कार्यकर्त्याच्या आवाहनानंतर भरणेमामा लागलीच आंदोलकांमध्ये येऊन बसले आणि राज्य सरकार तर पाठीशी आहेच, पण मी देखील स्वतःही यात सहभागी आहे असे सांगत त्यांनी राज्य सरकार यामध्ये सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचा लाईव्ह व्हिडीओ येथे पहा किंवा महान्यूज लाईव्हच्या फेसबुक पेजवर याचे संपूर्ण लाईव्ह चित्रीकरण पाहू शकता..
आज सकाळी अंथुर्णे येथे मराठा आंदोलकांनी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आक्रोश मोर्चासाठी कार्यकर्ते पायी भरणे यांच्या निवासस्थानी निघाले. ते निवासस्थानासमोरील फाटकासमोर आले आणि तेथेच त्यांनी ठिय्या दिला. तेथे मराठा आंदोलकांनी बीडमधील आत्महत्या केेलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यास व बलरामपूर येथील हाथरस प्रकरणातील पिडीतेस श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात अॅड. पांडूरंग जगताप, नितीन कदम, पवन घोगरे, गणेश घाडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर भरणे यांनी मराठा समाजाच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
ते म्हणाले, नेमके काय झाले आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र मराठा समाजावर कोणताही अन्याय हे सरकार होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार याबाबत गंभीर असून सकारात्मक पावले उचलत आहे. सरकार म्हणून तर आम्ही पाठीशी आहोतच, मात्र वैयक्तिक मी देखील नेहमीच या आरक्षणाच्या बाजूने तुमच्याबरोबर राहीलो आहे. फक्त आरक्षणाच्या या लढाईत आत्महत्या कोणीही करू नका. हे सरकार निश्चित योग्य ती पावले उचलेल.










