घनश्याम केळकर – बारामती
समाजाला काय गरज आहे हे जाणून ती गरज पुर्ण करण्यासाठी जो उत्पादन करतो तो खरा उद्योजक असतो. यासोबत कष्ट करण्याची आणि धोका पत्करण्याची तयारी हे गुण अंगी असतील तर तो यशस्वी उद्योजक होतो. असेच यशस्वी उद्योजक असलेले पांडुरंग सोनवणे हे यावर्षीच्या भुमीपुत्र आयडॉल २०२५ चे मानकरी आहेत.
आपण आपले काम असे निवडावे की ज्यातून लोकांच्या आयुष्यात काही बदल घडावेत. पांडुरंग सोनवणे यांच्या कामातून आज हजारो एकर शेतजमीनवर शाश्वत पाण्याचे साठे निर्माण झालेले आहेत. मुळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सोनवणे नोकरीनिमित्ताने जेजुरीत आले.
त्यानंतर प्रथम नोकरी करत असतानाच प्रथम बाजारी पिशव्या बनवून त्याची विक्री करण्यास सुरवात केली. यातून पुढे जाऊन त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. यातूनच त्यांनी शेततळ्यासाठी लागणारा प्लास्टीक कागद उत्पादित करण्याचा उद्योग सुरु केला. प्रथम ते शेतकऱ्यांना केवळ कागद विकत असत. पण शेततळे तयार करून देणाऱ्या तंत्रज्ञांची शेतकऱ्याला गरज असते हे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी पुर्ण शेततळे उभे करून देण्याचा काम सुरु केले. आजअखेर त्यांनी २५ हजाराहून अधिक शेततळी तयार करून दिलेली आहेत. बेभरवशाचा पाणीपुरवठा हा शेतीमधली सगळ्यात मोठी अडचण ठरत आली आहे. या शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली आहे. अर्थातच त्यांच्या जगण्यात स्थिरता निर्माण करण्यामध्ये पांडुरंग सोनावणे यांच्या उद्योगाचा मोठा हातभार लागलेला आहे.
आज पांडुरंग सोनवणे हे नवीन उद्योजकांसाठी आदर्श आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक सामाजिक कामातही त्यांचा सहभाग आहे. आता त्यांनी बांधकाम क्षेत्रातही काम सुरु केले असून जेजुरी, नीरा लोणंद, सासवड, बारामती, फलटण, चाकण परिसरात त्यांची कामे सुरु आहेत.
असे हे पांडुरंग सोनवणे भीमपुत्र आयडॉल २०२५ चे मानकरी आहेत. हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.











