बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी सामने खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. दि. १२ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत बारामतीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील रणजी सामना खेळवला जाणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या सामन्याचा प्रारंभ केला जाणार आहे.
बारामतीत रणजी सामान्यांचे आयोजन व्हावे या दृष्टीने शरद पवार यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही रणजी सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या संघात होत आहे.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत या सामन्याचा प्रारंभ होणार आहे. बारामतीत होणारे हे रणजी सामने बारामतीकरांना मोफत पाहता येणार आहेत.










