सातारा : महान्यूज लाईव्ह
घटना आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवडी गावची. या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व अंगणवाडीत शिकणारे बहीण भाऊ उरमोडीच्या कालव्यात वाहून गेले. यात बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रिया व सत्यम इंगळे अशी ही चिमुकली बहीण भावांची नावे आहेत. यातील रिया हिचा मृतदेह सापडला, परंतु सत्यम चा मृतदेह अद्यापपर्यंत सापडला नव्हता. शिरसवडी गावातील शिवाजी इंगळे हे गावच्या तळवस्ती येथे उरमोडी कालव्या शेजारी राहतात. त्यांची सत्यम व रिया ही मुले शिरसवडी गावातील गोपूज ओढा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकतात. त्यामध्ये सत्यम हा इयत्ता दुसरीत शिकतो, तर रिया ही अंगणवाडीत जाते.
2 एप्रिल रोजी दोघेही शाळेत गेले. त्यानंतर शाळा सुटल्यानंतर ओळखीच्या पालकांबरोबर दुचाकीवर बसून दोघेही घराकडे गेले. घर जवळ आल्यानंतर दोघेही उरमोडी खाल्या कालव्यावरून चालत असतानाच दोघेही गायब झाले. दुपारी येणारी मुले अजून का घरी आले नाहीत म्हणून घरचे शोधाशोध करू लागले.
तेव्हा शिरसवडी भागातीलच उरमोडी खालव्याच्या शरेवस्ती भागात मुलगी पाण्यावर तरंगताना दिसली. त्यावरून नागरिकांनी पोलीस पाटलाला खबर दिली. पोलीस पाटलांनी वडूज पोलिसांना माहिती दिली. वडूज पोलिसांनी कालव्यातून रिया हिचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र सत्यम सापडला नाही.











