जेजुरी : महान्यूज लाईव्ह
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सोन्याच्या जेजुरीत भक्तांच्या लाडक्या खंडोबासाठी उधळल जाणारा भंडारा हा भेसळयुक्त असल्याचा दावा खंडोबा देव संस्थांच्या माजी विश्वस्ताने केला असून याप्रकरणी सरकारकडे मागणी केली आहे.
जेजुरीच्या मार्तंड देवसंस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली. झिरवाळ यांनी देखील यासंदर्भात तातडीने माहिती घेऊन याची चौकशी करू असे आश्वासन दिले आहे.
शिवराज झगडे यांनी केलेल्या मागणीनुसार भंडारा हा भेसळयुक्त असल्याने भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनत चालला आहे. गेल्या अनेक दिवसापासून याची मागणी होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जेजुरीच्या गडाला देखील या भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे धोका निर्माण झाल्याची माहिती झगडे यांनी या निवेदनाद्वारे झिर्वाळ यांच्याकडे दिली.
जेजुरीतील ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी हे सारे जण वारंवार देवस्थानला तसेच प्रशासनाला भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा अथवा भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री थांबवा अशी मागणी करत आहेत, मात्र ते थांबत नाही आणि बाहेरील व्यापारी येथे येऊन टर्मरिक पावडर, यलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विकत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा भंडारा भेसळयुक्त येत असल्याचे वारंवार सांगूनही कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही थेट राज्याच्या प्रशासनाकडे ही मागणी केल्याचे झगडे यांनी सांगितले.











