(बारामती मध्ये येत्या 20 एप्रिल रोजी भीमपुत्र आयडॉल २०२५ या विशेष पुरस्काराचे वितरण होणार आहे. यामध्ये देशभरातील नामांकित व समाजासाठी झटणारे विविध क्षेत्रातील सत्कारमूर्ती सहभागी होणार आहेत. त्यांची ओळख करून देण्यासाठी पुढील काही दिवस महान्यूज मध्ये याची मालिका प्रकाशित होणार आहे. अत्यंत वेगळे आणि लोकांना माहिती नसलेले असे हे सगळे मानकरी आहेत त्यांची ही ओळख)
मारुती तात्याराव बनसोडे – नळदुर्ग, जि. धाराशिव! खराखुरा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता ही मानवजातीतील एक दुर्मिळ प्रजाती आहे. नळदुर्गचे मारुती तात्याराव बनसोडे याच प्रजातीतील आहेत. बनसोडेंच्या आयुष्याच्या बायोडेटामध्ये घर, संसार, गाडी, बंगला, प्रॉपर्टी हे तळाच्या रकान्यात येतात. १ ते ९९ मध्ये त्यांनी समाजासाठी काय काय केले याची नोंद होते. असे वयाच्या २० व्या वर्षी १९८८ पासून सतत सामाजिक कार्यात राहिले मारुती तात्याराव बनसोडे बारामतीत पहिल्यांदाच होत असलेल्या पहिल्या भीमपुत्र आयडॉल २०२५ चे मानकरी आहेत.
वयाच्या २० व्या वर्षी ते गुजरामधील एका राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरण सुरक्षा युवा परिषदेला हजर होते. त्याचवर्षी पशुहत्या विरोधी आंदोलनात सक्रिय सहभागी होते. वयाच्या २२, २३ वर्षी जिथे नोकरी आणि छोकरीची चिंता करायची तिथे अंधश्रद्धा निर्मुलनावर व्याख्याने देत फिरत होते. त्यांनी एका वर्षात तब्बल १०१ व्याख्याने दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी त्यांनी हा उपक्रम केला. त्यानंतर १० वर्षे ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम पहात होते.
यादरम्यान त्यांची बाजारात एका पोतराज बनलेल्या मुलाशी भेट झाली. त्या मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांना इतके दुख: झाले की त्यांनी पोतराज प्रथेचे निर्मूलन करण्याचा विडाच उचलला. त्यासाठीच्या अनेक परिषदा घेतल्या . आजअखेरपर्यंत त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील ११८ पोतराजांची या प्रथेतून मुक्तता केली आहे.
याच दरम्यान त्यांनी परिवर्तन या संस्थेची स्थापना केली. असा हाडाचा कार्यकर्ता फार भाबडा असतो, पण अभ्यासू नसतो. बनसोडेंच्या बाबतीत मात्र तसे नाही. आपल्याला जे करायचे आहे त्यासाठी लागणारी अनेक प्रशिक्षणे त्यांनी घेतली. पाणीपुरवठा कर्मचारी प्रशिक्षण, उद्योजकता विकास प्रशिक्षकाचे प्रशिक्षण, स्वयंसहाय्य समुह प्रशिक्षकाचे प्रशिक्षण, ग्राहक जाणीव जागृती प्रशिक्षण, कायकर्ता क्षमता विकास प्रशिक्षण, भुजल व्यवस्थापन जागृती व प्रबोधन प्रशिक्षण, स्वयंसेवी सेवा व्यवस्थापन प्रशिक्षण अशी अनेक प्रशिक्षणे त्यांनी घेतली. त्यातून समस्येचा शास्त्रशुद्ध रितीने आढावा घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे काम ते करत राहतात.
अशी प्रशिक्षणे, परिषदा, पदयात्रा, आंदोलने, निवेदने चालू आहेत त्याला आता जवळपास ३७ वर्षे होत आली. अजूनही ते त्याच कामात आहेत. परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून पोतराज पाहणी, प्रबोधन आणि पुर्नवसन प्रकल्प सुरुच आहे. महिलांचे संघटन बांधले जाते आहे. बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार कार्यशाळा चालविल्या जात आहे. आरोग्य, पर्यावरण, व्यसनमुक्तीवर काम सुरु आहे. याखेरीज पाणलोट जनजागृती, वृक्षारोपणाची कामे सुरु आहेत. नळदुर्ग परिसरातील अनेक संस्थांसोबत त्यांनी नेटवर्क बनविले असून सर्वांच्या सहकार्याने अनेक कामे केली जात आहेत.
खरा सामाजिक कार्यकर्ता होणे हे सोपी गोष्ट नाही. तापत्या निखाऱ्यावर चालण्याचे व्रत साऱ्या आयुष्यभर निभावण्याचे हे काम आहे. मारुती बनसोडे त्यांच्या आजवरच्या सगळ्या आयुष्यात हे व्रत सांभाळत आले आहे. पण ही प्रजाती जपणे आणि संरक्षित करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
असे हे भीमपुत्र आयडॉल २००२५ चे मानकरी मारुती तात्याराव बनसोडे. भीमपुत्र आयडॉल २०२५ चा हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.)











