ज्ञानेश्वर रायते, बारामती
राज्यातील यंदाचा गळीत हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. गळीत हंगाम येत्या दहा दिवसात संपू शकतो. राज्यात फक्त 11 कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 80 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. मात्र यावर्षी साधारणपणे नऊ ते दहा लाख टन साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या गळीत हंगामात 200 साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सुरुवात केली होती. त्यापैकी 189 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. या हंगामात सरासरी नऊ लाख टन दररोज राज्यात गाळप झाले आणि त्यानुसार 846 लाख टन उसाचे गाळप झाले. यावर्षी राज्यांमध्ये साखर उतारा तुलनेने कमी राहिला. सरासरी राज्याचा साखर उतारा 9.46% आजपर्यंत आहे.
यावर्षी जानेवारीनंतर गाळप झालेल्या उसाची काही कारखान्यांनी अजूनही बिले दिलेली नाहीत. त्याचप्रमाणे यंदा ऊस कमी असूनही काही ठिकाणी पळवापळवी तर काही ठिकाणी उसाचा दर कमी असे विरोधाभासी चित्र दिसले. खाजगी साखर कारखाने आता सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास बरोबरीला आल्याने आता खाजगी कारखान्यांचे गळीत हंगामावर वर्चस्व निर्माण झाले आहे. कारण राज्यातील यावर्षी केवळ 99 सहकारी, तर तब्बल 101 खाजगी कारखाने गळीत हंगामात सहभागी झाले होते.











