नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्याचा भारत सरकारचा निर्णय हा ऐतिहासिक, दूरगामी,नव्या युगाची सुरूवात करणारा आणि सहकारी क्षेत्राला बळकटी देणारा असून ही दूरदृष्टी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी दाखविल्या बद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आणि या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
या निमित्ताने हर्षवर्धन पाटील पुन्हा चर्चेत आले असून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीला साथ देणारे हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीच्या वेळी थेट शरद पवार यांच्या पक्षात आले. खरेतर राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद अमित शहांच्या माध्यमातून मिळाले असल्याचे हर्षवर्धन पाटील वारंवार सांगत होते आणि खुद्द अमित शहा देखील हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक करताना थकत नव्हते. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांनी त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून शहा मोदींचे कौतुक केले आहे.
राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष या नात्याने हर्षवर्धन पाटील यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असली, तरी या कौतुकाची देखील राजकीय चर्चाच अधिक होत आहे. दरम्यान त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या निर्मिती द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून खूप काही साधले गेले असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आणि या उपक्रमाद्वारे जागतिक दर्जाचे शिक्षण, मूलभूत संशोधनाच्या संधी निर्माण होतील आणि त्याने सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल अशी भावना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने व्यक्त केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्याचा भारत सरकारचा निर्णय हा भारतातील सहकारी चळवळीसाठी नव्या युगाची सुरुवात आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि गृह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने एक परिवर्तनकारी पाऊल उचलले आहे. त्याने सहकारी क्षेत्राचे भविष्य घडेल. हे विद्यापीठ ज्ञानकेंद्र म्हणून काम करेल, व्यावसायिकांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल आणि त्याने सहकारी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याने सुसज्ज करेल.
सहकारी साखर उद्योगाची पाळेमुळे सामाजिक, आर्थिक आणि ग्रामीण विकासाशी खोलवर जोडली आहेत. त्यामुळे या उपक्रमाचे मी मनापासून स्वागत करतो,असेही श्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश नाईकनवरे यांनीही भारत सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या स्थापनेच्या निर्णयाने कौशल्यातील कमतरता दूर करण्यास चालना मिळेल, विशेष सहकारी अभ्यासक्रम सुरू करण्यास आणि देशभरातील 284 हून अधिक प्रशिक्षण संस्थांना बळकटी देण्यास मदत करेल आणि भारताच्या आर्थिक विकासात सहकारी क्षेत्राचे कार्य आधारस्तंभ म्हणून अबाधित राहील.











