इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना गुजरात दर्शन सहलीचे नियोजन करून देतो असे सांगून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील ट्रॅव्हल चालकाने डबल 9 लाख 74 हजार रुपयांची रक्कम घेतली व प्रत्यक्षात बोगस तिकिटे तयार करून ती ज्येष्ठ नागरिक संघास पाठवली. मात्र प्रत्यक्षात ही सहल बोगस निघाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी अगोदर इंदापूर पोलीस ठाणे गाठले होते. तेथे चेक दिल्यानंतर ते चेक वटले नाहीत. त्यामुळे आता जेष्ठ नागरिकांनी थेट इंदापूरच्या न्यायालयाचा आसरा घेतला आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरून मन रमवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठांची फसवणूक केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टेंभुर्णी येथील नितीन ट्रॅव्हल कंपनीला इंदापुरातील ज्येष्ठ नागरिक संघाने संपर्क साधला, तेव्हा या ट्रॅव्हल कंपनी चालक मालकाने विमान प्रवास, निवास, नाष्टा आणि भोजन खर्च त्याच्यासह सहलीचे नियोजन करून देतो असे आश्वासन दिले.
त्या बदल्यात प्रत्येकी 23 हजार रुपये प्रमाणे 44 ज्येष्ठ नागरिकांकडून नऊ लाख 74 हजार रुपयांची रोख रक्कम त्यांनी घेतली. त्यानंतर पुणे ते अलाहाबाद या टाटा इंडिगो विमानाची बोगस तिकडे बुक करून या ज्येष्ठ नागरिक संघाला ट्रॅव्हलचालकाने पाठवली. प्रत्यक्षात 25 नोव्हेंबर रोजी जेव्हा सर्व ज्येष्ठ नागरिक ठरल्यानुसार सहलीला जाण्यासाठी बसची वाट पाहत राहिले.
तेव्हा बस किंवा कोणीच आले नाहीत. त्यानंतर आपला भाऊ अपघातात मृत्यू पावला आहे असे सांगून ट्रॅव्हल चालकाने दिशाभूल केली. मात्र अपघातात कोणीतरी मृत पावले आहे, म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी व सांत्वन करण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिक टेंभुर्णी येथे गेले असता, अशा प्रकारचा कोणताही अपघात झालेला नव्हता आणि हा ट्रॅव्हल चालक आपल्याला फसवून फरार झाला असल्याचे जेष्ठ नागरिकांच्या लक्षात आले.
त्यावरून 28 नोव्हेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अर्ज दिला त्यावरून पोलिसांनी ट्रॅव्हल चालकाला बोलावून घेतले. त्यावेळी सहलीसाठी घेतलेले पैसे माझ्याकडून इतरत्र खर्च झाले असून तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम देतो म्हणून त्याने नोटरी करून धनादेश दिले. मात्र तीनही धनादेश बँकेतून न वठता परत आल्याने ज्येष्ठ नागरिक संघाने इंदापूर न्यायालयात धाव घेतली व त्या ठिकाणी खटला दाखल केला.











