तानाजी काळे, ज्येष्ठ पत्रकार, पळसदेव इंदापूर (९४२३५३४५१५)
वऱ्हाड म्हणजे वधू -वर पक्षाचा जिव्हाळ्याचा घटक. गावाकडची जीवाभावाची माणसं,भाव -भावकी ,पाहुणे मंडळी जवळचे नातलग, आप्तेष्ट , मित्र – मैत्रीणी, शेजारी- पाजारी हा सारा लवाजमा एकत्र करून एखाद्या वाहनाने लग्नाला जाणं म्हणजे ‘वऱ्हाड’!
तीस – चाळीस वर्षांपूर्वी वऱ्हाडाच्या वाहनाने केलेला प्रवास हा तर आणखी गमतीदारच.
चाळीस – पंचेचाळीस वर्षांपूर्वी आमच्या लहानपणी एकेकाळी आम्ही थोडा – फार काळ बैलगाडीतूनही प्रवास केला आहे. बैलगाडीतील वऱ्हाडाच्या प्रवासाची मजा तर काही औरच होती. मजल दरमजल करीत तट्या बांधलेल्या बैलगाड्या वऱ्हाड घेऊन चालायच्या. प्रत्येक गाव जवळ आलं की, त्या गावच्या गावकऱ्यांचा एक हमखास प्रश्न असायचा. ‘ पाहुणंं कंच्या गावचं वऱ्हाड म्हणायचं ? अन् कुठं चाललायसा?
त्याला उत्तर देत गाड्या पुढे मार्गस्थ व्हायच्या. लांब पल्ल्याला वऱ्हाड चाललं असेल तर, बैलगाड्या पाच- सहा तासांचा प्रवास झाल्यानंतर एखादी विहीर व सावलीचे झाड पाहून विसाव्यासाठी थांबत असत. मग तिथं बरोबर आणलेली शिदोरी बेसन, भाकरी काही असेल ते खाऊन वऱ्हाड पुढचा पल्ला गाठत असे.
बैलगाडी नंतरच्या काळात ट्रॅक्टरची ट्रॉली, टेम्पो आणि ट्रक या वाहनातून ग्रामीण भागातील वऱ्हाडाचा प्रवास व्हायचा. वऱ्हाडाच्या वाहनालाही तितकाच महत्व होतं. वऱ्हाडाचे वाहन इसार देऊन अगोदरच पक्कं( बुकिंग ) केलं जायचं . ट्रक मध्ये जास्त माणसं बसत असल्याने लग्न मालकाची ट्रकलाच जास्त पसंती असायची.
वऱ्हाडाचा ट्रक घेऊन जाणारा ड्रायव्हर त्यावेळी जणू विमानाचा पायलटच भासायचा. अनेकदा अशा या वऱ्हाडाच्या वाहतुकीचा खर्च नवरी मुलीच्या वडीलांकडून घेतला जायचा. लग्न जमवितानाच ही अट घातली जायची. हुंडा देणे- घेण्याच्या अनिष्ट प्रथेतच वऱ्हाड येण्या -जाण्याच्या खर्चाचा समावेश असायचा. वऱ्हाड वाहतुकी पोटी काही रक्कम मुलीच्या वडीलांना मुलाकडच्या मंडळीला द्यावी लागायची. अशा अवास्तव खर्चाने मुलीचा वडील मेटाकुटीला यायचा. हे सांगायलाच नको. मग असं हे वऱ्हाड आपला नवरदेव घेऊन ज्या गावी लग्न असेल तिथं जायचं.
एकदा का वऱ्हाडाची गाडी हॉर्न वाजवत गावात आली की, साऱ्या गावाला माहिती व्हायचं. पटापटा… पटापटा गावातली माणसं, पोरं ट्रकमध्ये बसण्यासाठी गोळा व्हायची .तात्या आला का बघा .आण्णा आला का बघा. नाना आला का बघा. भावकीतला आबा, तात्याराव, भाऊ, नात्यातल्या आत्याबाई, मावशीबाय बसल्या का. वरमायचं उरकलं का? काही घडीभर हाच कालवा व्हायचा.
नवरदेवाबरोबर सात -आठ पोरं ‘कुलवरा’ म्हणून आजूबाजूला मिरवायची. जेणेकरून नवरदेवाबरोबर ट्रकच्या पुढच्या तोंडामध्ये (कॅबिन) बसायला आपल्याला जागा मिळेल, ह्या आशेने पोरं नवरदेवाची पाठ सोडत नसत. परंतु ट्रकचा पुढील भाग कॅबिन वरमाय, नवरदेवाच्या बहिणी, आत्याबाय, मावशीबाय ह्यांनीच पॅक व्हायचा. नवरदेव कसाबसा त्या ट्रकच्या कॅबिन मध्ये बसायचा.
नवरदेव व वऱ्हाड आणण्यासाठी नवरी मुलीकडून एक पाहुणा माणूस यायचा .त्याला ‘वऱ्हाडी’ म्हणत असत. त्याची फारशी कोणाशी जास्त ओळख नसल्याने तो वऱ्हाड गोळा होईपर्यंत आजुबाजुला अवघडल्यागत तरंगत असे. मग कोणाच्यातरी लक्षात आल्यानंतर त्या पाहुण्याला ट्रकच्या हौदातील पब्लिक मध्ये बसवायचे. पण अगोदरच ट्रकचे कॅबिन गच्च भरलेलं राहायचं. मग ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर त्याला बसण्यासाठी कशीबशी जागा करून देण्यात येत असे. या सीटवर नीट बसता पण येत नसायचं. उभ्या प्रवासात तो पाहूणा अवघडून जायचा.
पुढे जागा नसल्याने नवरदेवाबरोबरचे सारे कुलवरे पाठीमागे यायचे. तोपर्यंत ट्रकचा हौद पूर्ण खचाखच भरलेला राहायचा. मग पुढे बसण्याच्या आशेने टपून बसलेली सारी पोरं हौदात जागा नसल्याने त्यांना कॅबिनच्या टपावर बसायला लागायचं. काही पोरं तर आवर्जून टपावरच बसायची. संपूर्ण प्रवासात त्यांनाही आपण हवेत विमान प्रवास करतोय. असाच भास व्हायचा. आडवळणी खेडेगावात लग्न असेल, कच्चा रस्ता असेल तर झाडाच्या फांद्या, वेड्या बाभळीच्या फांद्या त्यांच्या काट्यांचे बरेच वरखडे टपावर बसलेल्या मंडळीला लागायचे.
कोणाचा शर्ट फाटायचा, कोणाची टोपी झाडाच्या फांद्यांवर लटकायची. ड्रायव्हरने अचानक एखादं जनावर आडवं आल्यावर खच्चून ब्रेक मारला तर हौदात उभी राहिलेली पोरं खाली बसलेल्यांच्या अंगावर पडायची. हौदात एकच कालवा व्हायचा. पाच- पन्नास पोरात एखादं -दूसरं पोर प्रवासात कायम एखाद्याच्या अंगावर उलटी करायचं. त्याची उलटी पाहून दुसऱ्या दोन- चार पोरांच्या आपोआपच ओकाऱ्या निघायच्या. मग ही सारी उलट्या करणारी ‘टीम’ पाठीमागे फाळक्यावर रस्त्याकडे त्वांड करुन ओकायसाठी उभी केली जायची.
अशातच एखाद्या पोराचा आवाज करीत अपानवायु सुटायचा. मग बाकीची पोरं नाक दाबून धरत त्याच्यावर तुटून पडायची. काय खाऊन आलाय? इथंपासून ते कशाला येत असतोस रे! वऱ्हाडाच्या गाडीत? त्याला नको ते बोलायची. तो ही आरोपी सारखा मान खाली घालून ओशाळून नाही त्यांचं बोलणं खायचा.
रस्त्यावरील फुफाट्याने तर प्रत्येकाचं त्वांड पहाण्यालायक व्हायचं.
त्यावेळी पाण्याच्या बिसलरी बाटलीची सोय नसल्यामुळे लहान- सहान पोरं पाण्यासाठी घशाला कोरड पडून पाकळून जायची. .कोणीतरी जाणकार आबा -आण्णा ड्रायवरला सांगायचे , पोरांना तहान लागलीय गाडी थांबवा. मग कुठेतरी रस्त्यालगतची विहीर, पाणी पाहून ट्रक थांबायची. फुफाट्याचं त्वांड पाण्याने धुतलं तर निम्म्या वऱ्हाडाकडं रुमाल नसायचा. धोतरावाली धोतराच्या सोग्याने त्वांड पुसायची. बाकीची शर्टाच्या बाहीने , तोंड पुसत पाणी पिऊन वऱ्हाड मार्गस्थ व्हायचं.
कोणीतरी हिंडल्या- फिरलेला माणूस मध्येच अचानक आरोळी ठोकायचा . पुढे पोलीस आहेत. हितच पोलीस चेकनाका आहे. वऱ्हाडाच्या गाडीला पोलिसांची प्रचंड भीती राहायची. कधीकधी पोलीसांचा नाका चुकवायला ड्रायव्हर आड बाजूने वऱ्हाडाची ट्रक काढायचा. अनेकदा रस्ता चुकायचा. कधी पोलीस वऱ्हाडाच्या गाड्या पाठलाग करून पकडायचे. सिनेस्टाईल पाठलाग व्हायचा. एकदाची पोलिसांनी गाडी धरली की , पोलिसांचीही मोठ्या स्मगलरचीची गाडी धरल्यागत छाती फुगायची. पोलीस ड्रायव्हरकडे धावतच यायचे.
मग कोणीतरी तात्या, अण्णा बहुतेक करून पॅन्टवालाच माणूस ड्रायव्हरच्या सोबतीला खाली उतरवला जायचा. त्या भागात आपल्या गावातला कोणी पोलीस आहे का. हे पाहिले जायचे. आमचं गाव हे जुन्या काळापासून पोलीस व फौजदारांचं गाव म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे चार, दोन मोठ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगून त्यांच्या भावाचं- बहिणीचे, पुतन्याचे लग्न आहे.म्हणून सांगितले जायचे.
त्याचा पुरावा म्हणून लायसन दाखवतात तशी लग्न पत्रिका दाखवली जायची. लग्न पत्रिकेवर आवर्जून पोलीस खात्यातील मोठ्या हुद्द्यावर असलेल्या चार- दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं प्रेक्षक, कार्यवाहक, स्वागतोत्सुक म्हणून आवर्जून टाकली जायची .ती पत्रिका दाखवताच एवढा पाठलाग करून गाडी पकडल्याचं पोलीसांचे सारं श्रेय वाया जायचं..
पोलीसही गाडी सोडून द्यायचे. कधीकधी वाहनांवर गुन्हाही दाखल व्हायचा. पोलिसांनी पकडलेली वऱ्हाडाची गाडी अर्धा तास ताटकळून सोडल्यावर , वऱ्हाडी मंडळींनाही जेल मधून बाहेर पडल्यासारखा आनंद व्हायचा.
एकदाचं वऱ्हाड लग्न घरी पोहोचलं की मांडवात… वाजंत्री वाजवाय सुरुवात करायचे. मग लग्न मालक त्यांची भावकी, पाहुणे वाजंत्र्यासह वऱ्हाडाच्या स्वागताला पाण्याचा हंडा , पानसुपारी घेऊन पुढे यायचे. पाण्याचा हंडा रस्त्यावर आडवा ओतून पानसुपारीचा मान एकमेकांना देऊन – घेऊन एकदाची गळाभेट झाली की, वऱ्हाडातली पोरं वाडग्यात कोंढलेली मेंढरं सोडल्यावर जशी पटापट बाहेर पडत्यात , तशी ट्रकच्या हौदातून बाहेर पडायची .
मग सगळ्यांना ‘जानवसा’ घरी नेलं जायचं. लग्न मालकाच्या घरापासूनच जवळच एखाद्याच्या घरी पाहुणे मंडळीच्या वऱ्हाडाची तात्पुरती सोय केली जायची. त्या घराला ‘जानवसा’ घर म्हणायचे. मग तिथे गेल्या- गेल्या बेसन- भाकरी ,मिरचीचा ठेचा, लापशी किंवा शिरा असा नाश्ता दिला जायचा. मग हे सारं ‘वऱ्हाड’ दोन घास खाऊन स्थिर होत, लग्नासाठी सज्ज व्हायचं.
आता बहुतांशी लग्नाला एयर कंडीशन गाड्या, वेगवेगळ्या जीप गाड्या पाहिल्या की, जुन्या काळातील वऱ्हाडाची नकळत आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!











