बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती नगरपालिकेचा टाऊन प्लॅनिंगचा अधिकारी फक्त सहीच्या फॉरमॅलिटीसाठी पैसे मागायचा. त्याची सही किती रुपयांना? तर त्याला वाटेल तेवढ्याला! बारामतीतील एका बांधकाम व्यवसायिकाला चक्क फक्त सहीसाठी एक लाख रुपयांची लाच मागणारा हा अधिकारी आज लाच घेताना सापडला.
विशेष म्हणजे लाच घेतानाचा सापळा हा बारामतीतील एका जिम मध्ये लावण्यात आला. व्यायामाच्या निमित्ताने जाणारा हा अधिकारी एक लाख रुपयांची लाच घेताना यामध्ये सापडला. गेल्या अनेक महिन्यांपासून या अधिकाऱ्याच्या लाचखोरीची चर्चा बारामतीत होती. व्यवसायिकांची प्रचंड लूट त्याने चालवली होती. मात्र अनेकदा बांधकाम व्यवसायिक आपले काम भले आणि आपण भले अशा स्थितीमध्ये ही प्रकरणे जिथल्या तिथे निपटून टाकायचे. या अधिकाऱ्याला आपला विकास करण्याची एवढी हाव होती की, समोरचा बांधकाम व्यवसायिक खरोखरच नफ्यात आहे की तोट्यात आहे हेही तो बघायचा नाही.
हा अधिकारी पैशाला एवढा भुकेलेला होता की, तो कोणाचेच ऐकायचं नाही. बारामतीतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाला त्याचे प्रकरण पूर्ण व सुयोग्य असतानाही केवळ सही करण्यासाठी लाच मागितली. अखेर तडजोडीमध्ये एक लाख रुपयांची लाच ठरली. मात्र वैतागलेल्या बांधकाम व्यवसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. तेथे पडताळणीत ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज हा सापळा लावण्यात आला.
या नगरचनाकाराने पावणेदोन लाखांची मागणी केली होती .त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना आज त्याला जिम मध्ये ताब्यात घेण्यात आले. लाचखोरीत तो सापडल्याने बांधकाम व्यवसायिकांनी अक्षरशः आनंद व्यक्त केला. असले हरामी अधिकारी बारामतीत जास्त दिवस का ठेवले जातात? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.











