पुणे : महान्यूज लाईव्ह
एकीकडे अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता वापर आणि दुसरीकडे बेकायदेशीर शस्त्रांचे महाराष्ट्रात होत असलेले हस्तांतर या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे. किंबहुना अगोदर बिहारला जी नावे ठेवली जात होती, ती आता महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ लागली आहेत.
पुण्यातील नागझरी भागात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून पुणे पोलिसांनी रविवारी रात्री एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूसे जप्त केली. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील अनेक गुन्हेगारीचे प्रकार पाहिले असता प्रौढ गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यातून चलाखीने सुटण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर गुन्ह्यात करू लागले आहेत. दुसरीकडे दूरचित्रवाणीवर दक्षिणात्य चित्रपटांचे वाढलेले प्रमाण आणि त्यातील गुन्हेगारी यामुळे अल्पवयीन मुले आपापल्या भागातील झोपडपट्टी दादांकडे आपला हिरो म्हणून पाहू लागली आहेत.
त्याचाच परिणाम अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी वाढण्यात होऊ लागला आहे. नागझरी परिसरात समर्थ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या मुलाला रविवारच्या रात्री संशयास्पद फिरताना दारूवाला ब्रिज चौकाजवळ पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याजवळ पिस्तूल सापडलेच, शिवाय त्याच्याकडे एक बंदूकही आहे अशी माहिती मिळाली होती.
पोलिसांनी त्याच्याकडील सिल्व्हर रंगाचे मॅक्झिन असलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी शास्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या मुलाला बाल न्यायालयात हजर केले. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र फडतरे, रोहिदास वाघरे, कल्याण बोराडे, भाग्येश यादव, इम्रान शेख, रहीम शेख, अमोल गावडे, शिवा कांबळे यांच्या पथकाने केली.











