डॉ. संदेश शहा, इंदापूर
दि बुद्धगया टेंपल ॲक्ट १९४९ रद्द करून महा बोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि.१७ मार्च रोजी) बौद्ध बांधवांकडून इंदापूर नगरपरिषदेपासून प्रशासकीय भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बौद्ध भंते यांच्या हस्ते तहसीलदार जीवन बनसोडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
चला एक साथ, एक पाऊल धम्म पथावर, बौद्धगयाचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्या, महाबोधी विहाराचे ट्रस्टी हटवा अशा स्वरूपाचे मजकूर असणारे विविध फलक घेऊन या मोर्चात बौद्ध भंते, समता सैनिक दलाचे जवान, महिला आणि बौद्ध बांधव सहभागी झाले होते.
बिहार सरकारचा बौद्ध गया महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द करा, महाबोधी महा विहार हे संपूर्णतः बौद्धांच्या ताब्यात द्यावे, महाबोधी महावीहारा तील ब्राह्मण प्रशासन हटवा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले.
महाबोधी महा विहार मुक्ती आंदोलन समिती इंदापूर तालुक्याच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांची संख्या लक्षवेधी होती. इंदापूर नगरपरिषद प्रांगणात यासाठी बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध भिख्खू तसेच बौद्ध अनुयायांनी त्रिशरण पंचशील घेऊन बुद्धवंदना घेण्यात आली.
हा मोर्चा इंदापूर नगरपरिषद ते तहसील कार्यालय असा झाला. यावेळी बौद्ध भिक्खू तसेच समता सैनिक दलाच्या जवानांनी तसेच बौद्धाचार्य आणि महिला तसेच बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्यासह ॲड. बापूसाहेब साबळे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब मखरे, बंटी सोनवणे, संदेश सोनवणे, संदीपान कडवळे, सुभाष खरे, अजित ठोकळे, नितीन झेंडे, शिवाजी शिंदे आदी सहभागी होते. प्रास्ताविक सूरज वनसाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. बापू साबळे यांनी तर आभार शिवाजी मखरे यांनी मानले.











