शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील पोलिसांनी कठोर कारवाई करत शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुलेट स्वरांना पकडून ज्यांनी बुलेटच्या सायलेन्सरला वेगळी तांत्रिक जोडणी करत मोठे आवाज काढलेले आहेत अशा बुलेटचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले आणि त्यावर रोडरोलर फिरवत ते नष्ट केले.
फक्त शिरूरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात अगदी गाव गाड्यात देखील सध्या बुलेट आणि इतर जास्त सीसीच्या दुचाकींना सायलेन्सर मध्ये बदल करून मोठे आवाज करायचे व आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे, असला प्रकार सडकछाप पोरं गावागावात करताना दिसत आहेत. शाळा सुटण्याच्या काळात, भर वस्तीत अशाप्रकारे गाड्यांचे आवाज वाढवून सर्वसामान्य नागरिक, प्रवाशी व रहिवाशांना यातून त्रास होत आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे, सण, जयंती उत्सवाच्या काळात अतिउत्साह दाखवून आयोजित करण्यात आलेल्या एखाद्या रॅली किंवा एकट्याच दुचाकीला अशा प्रकारचा मोठा आवाज करून आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा दुचाकीचालक तरुणांचा कल अलीकडे वाढला आहे. या साऱ्यांना आवर घालण्याची गरज होती. शिरूर पोलिसांनी शहराच्या विविध भागातून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले आणि आज खास रोड रोलर बोलवून ते सायलेन्सर चेंगरून टाकले.











