शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दाणेवाडी (ता.श्रीगोंदा) येथील माऊली गव्हाणे या युवकाच्या निर्घृण करण्यात आलेल्या खुनाचा लवकरच उलगडा होणार असून पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असून सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सागर दादाभाऊ गव्हाणे (वय.२०, रा. दाणेवाडी, ता.श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याचे सीमेवर असलेले दाणेवाडी हे गाव. या गावातील माऊली गव्हाणे हा युवक काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा गावाशेजारील दोन वेगवेगळया विहिरीत मृतदेह व मृतदेहाची इतर अवशेष मिळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस, अहिल्यानगर गुन्हे शाखा, बेलवंडी पोलीस स्टेशनचे तपास पथक हे विविध ठिकाणी आरोपींची तपासणी करत शोध घेत होते. दरम्यान या घटनेत ठोस पुरावा नसल्याने पोलिसांच्या तपासाला अडचणी येत होत्या. मात्र तरीदेखील पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण करून सागर दादा भाऊ गव्हाणे (वय.२० राहणार दाणेवाडी) यास ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना तपासात सांगितले.
दरम्यान या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून इतक्या क्रूरपणे व निर्दयीपणे आरोपींनी माऊलीचा का खून केला? याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी लवकरच खुनाचा उलगडा होणार असून पोलिसांच्या या तपासाकडे पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले असून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले जात आहे.











