राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
सरकारी रस्त्याची कामे तसेच जिल्हा परिषदेची विविध कामे टक्केवारीत अडकतात आणि अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे ही कामे व्यवस्थित होतच नाहीत. आता टक्केवारी घेतल्यामुळे कोणी तक्रार केली तरी अधिकारी दुर्लक्ष करतात आणि सगळ्या कामांची वाट लागते! आता हे वाट लावणारे कोण आहेत? तर सर्वांना माहिती आहे, पण सारे गप्प बसतात! काल मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंतासह, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता अशांची माळ लागली.. एका ठेकेदाराकडून तब्बल एक लाख 42 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तीन अभियंत्यांना पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 अन्वये जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाचा बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार, जिल्हा परिषदेचा उपविभागाचा उप अभियंता दत्तात्रय भगवानराव पठारे व जिल्हा परिषदेच्या दौंड उपविभागाची बांधकाम विभागाची कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे या तिघांना एक लाख 42 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
अगदी सेवानिवृत्तीला आले होते तिघे.. पण पैसा काही सुटेना!
गंभीर बाब म्हणजे यातला जो बाबुराव कृष्णा पवार आहे, कार्यकारी अभियंता पदावर असतानाही त्याला पैशाचा एवढा मोह की, आयुष्य 57 वर्ष वयाचे झाले आहे, पुढच्या वर्षी तो निवृत्त होणार आहे, परंतु निवृत्तीच्या शेवटच्या वर्षापर्यंत सर्वसामान्य जनतेच्या करातील पैसा पगार मिळत असूनही लाचेच्या स्वरूपात घेण्यास त्याला कोणतीही लाज शरम वाटली नाही. याच लाचखोरीतील दुसरा उपअभियंता दत्तात्रय भगवानराव पठारे हा देखील 55 वर्षांचा आहे क्लासवन श्रेणीचा हा अधिकारी दोन टक्के प्रमाणे पैसे मागत होता.
नेमकं घडलं काय?
दौंड तालुक्यातील या ठेकेदाराने त्याच्या फर्म च्या नावाखाली दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर असे या कामाचे टेंडर 2024 मध्ये प्रसिद्ध झाले होते, त्याची वर्क ऑर्डर ठेकेदार तक्रारदाराला मिळाली होती. या कामांमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिलाची रक्कम 40 लाख रुपये होत होती.
तक्रारदाराने काम केले. तीन मार्च 2025 रोजी यातील अंजली बगाडे हिने कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदेकडील एसक्युएम कमिटीने केलेल्या कामाची पाहणी करून अहवाल देण्यासाठी प्रत्येकी 7000 रुपये अशी 14 हजार रुपये मागितले. तसेच या दोन कामांच्या बिलाची रक्कम फाईल तयार करून मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करण्याकरता कामाच्या बिलाच्या रकमेच्या दोन टक्के प्रमाणे 80 हजार रुपयांची मागणी केली.
त्याच्यानंतर ठेकेदार हा पठारे याला भेटला. तेव्हा पठारे याने देखील दोन टक्के प्रमाणे 80 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ठेकेदार हा बाबुराव पवारला भेटला. त्यानंसुद्धा 80 हजार रुपयाची मागणी केली. थोडक्यात फक्त या तीनच अभियंत्यांनी मिळून तब्बल सहा टक्के या कामाच्या खर्चाच्या बिलाची रक्कम लाच म्हणून मागितली होती.
ही रक्कम जास्त होत असल्याने ठेकेदाराने तडजोड केली. तडजोडीनंतर पठारे व पवारला प्रत्येकी 64 हजार रुपये तर बगाडे हिला 14 हजार रुपये ठरले. त्यानंतर मात्र या अधिकाऱ्यांची प्रचंड मोठी खाऊ गल्ली तयार झाली असल्याने यांना धडा शिकवण्यासाठी हा ठेकेदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला त्याठिकाणी पडताळणी केल्यानंतर या तिघांनीही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सापळा रचल्यानंतर दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले.











