पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक व दूध प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक 12 मार्च रोजी झाली या बैठकीत गाई व म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस सहकारी व खाजगी दूध प्रक्रिया संघांचे 40 प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, संगमनेर दूध संघाचे चेअरमन श्री देशमुख, श्री श्रीपाद चितळे व पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे आदी उपस्थित होते.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार पाचपुते यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात बनावट पनीरचा मुद्दा नमूद केला. त्यापूर्वीच काही दिवस आधी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील पनीर बाजारात बनावट येत असल्याची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर संघाच्या बैठकीत चर्चा झाली. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खाते, त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन मंत्री, दूग्धविकास मंत्री यांची भेट घेऊन भेसळखोरांवर कडक कारवाईची मागणी करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय झाला. पनीर भेसळ रोखण्यासाठी संघातर्फे जनजागृती केली जाणार आहे.











