ज्ञानेश्वर रायते : महान्यूज लाईव्ह
स्वारगेटच्या प्रकरणात लिंगपिसाट आरोपी दत्ता गाडे याला पकडल्यानंतर त्याचे वकीलपत्र घेणाऱ्या त्याच्या वकीलाने पीडित आणि दत्ता गाडे या दोघांमध्ये व्यवहार झाला होता आणि तो साडेसात हजार रुपयांचा होता अशी माहिती दिली होती. त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये ही माहिती दिली आणि त्यानंतर कोर्टामध्ये मात्र ही माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली नाही.
त्यावरून पत्रकारांनी विचारले असता आरोपीच्या वकिलांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र केवळ प्रसिद्धीसाठी आणि पिडीतेची सहानुभूती कमी करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले असून, यातील वकिलावर कारवाई होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आरोपीच्या वकिलांनी दत्ता गाडेला पकडल्यानंतर आरोपीने पिडीतेला साडेसात हजार रुपये दिले होते आणि दोघांमध्ये सहमतीने शरीरसंबंध झाला होता अशी माहिती दिली होती. मात्र न्यायालयात आतापर्यंत हा मुद्दा मांडला गेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी पिडीतेचे चारित्र्यहनन करण्याचा हा आरोप असल्याने पीडित युवती डिप्रेशनमध्ये गेली.
तिने थेट पोलीस अधिकाऱ्यांनाच माझ्या बदनामीचे काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पोलीस अधिकारी देखील निरुत्तर झाले होते. मात्र खरोखरच न्यायालयीन व्यवस्थेचे, कायदा आणि सुव्यवस्थेचे एखाद्या वकिलाने धिंडवडे काढले, तर त्याच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होतोच.
या देशातील कायदा सर्वांसाठी समान असेल तर कारवाईची अपेक्षा आहे असे आता लोक बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस खरोखरच काय भूमिका घेणार? याचीही सध्या चर्चा सुरू आहे. वकिलाच्या संबंधित वक्तव्यामुळे समाजमाध्यमावर पीडितेची बदनामी झाली. या पिडीतेला मानसिक त्रास झाला आणि तिच्यावर रूग्णालयात उपचार करावे लागले. या पार्श्वभूमीवर आता कायदा कायद्याचे काम करणार का? हा सवाल आहे.











