मुंबई : महान्यूज लाईव्ह
अमेरिकेचे टेरीफ प्रकरण, नवीन सरकारची अचानक बदललेली धोरणे तेथील वाढती महागाई आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता याचा परिणाम सर्वाधिक भारतात झाला असून भारतातील आयटी कंपन्या अडचणीत आल्या आहेत. साहजिकच आयटी कंपन्यांचे बाजार मूल्य तब्बल 88 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. एकूणच देशात नव्या मंदीची चाहूल येऊ लागली आहे.
जागतिक परिस्थितीचा विचार करत सध्या शेअर बाजारात मोठी पडझड होत आहे. त्याचे परिणाम गाव पातळीवर देखील दिसू लागले आहेत. गेल्या काही वर्षात शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील ही युवक व्यावसायिक व्यापारी विक्रेते शेअर मार्केटमध्ये येऊ लागले आहेत आणि साहजिकच शेअर मार्केट मधील कोणताही प्रकारचा ताण हा गावावरही येऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये झालेली पडझड ही गाव पातळीवरही जाणवू लागली आहे.
देशातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. विप्रो कंपनीचे 16% पर्यंत घसरलेले शेअर, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या मोठ्या प्रमाणावर घसरले असून गुंतवणूकदाराचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच कंपन्यांची देखील मार्केट व्हॅल्यू 88 हजार कोटींनी घसरल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मंदी जाणवण्याची शक्यता आहे.
अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार या वर्षात अमेरिकेमध्ये 40% प्रमाणात महागाई वाढू शकते व तेथील मंदीचा फटका भारतात बसण्याची शक्यता आहे. अर्थात जर केंद्र सरकारने यावर वेळीच पावले उचलली व आपल्या बाजारपेठ युरोपियन देशांमध्ये केंद्रित केल्या, तर फरक पडू शकतो असेही अर्थतज्ञांचे मत आहे.











