भिगवण : महान्यूज लाईव्ह
गेल्या दोन अडीच वर्षात इंदापूर तालुक्यात प्रकरण कसलेही असो, एका फौजदाराने एवढा उतमात केला. त्याचं पैशाशिवाय कधी पानच जागचं हालायचं नाही. हा अतिरेक एवढा झाला की, आज त्याचे जणू सगळे अपराध जुळून आले. अखेर हा भ्रष्टाचारी फौजदार लाचखोरीच्या सापळ्यात आज अडकला.
इंदापूर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यातील फौजदार हा आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळते आहे. गेल्या अनेक महिन्यापासून याची चर्चा सुरू होती. कोणीही काही बोलू शकत नव्हते. मात्र आज घडा भरला. लाचखोरीत हा फौजदार एवढा ‘बनला’ होता की, कधी याची बदली होते याच्याच प्रतीक्षेत लोक होते. या कथित भ्रष्टाचारासाठी लोकांनी ‘क्लासमेट’ हा शब्द नव्याने या भागात रूढ केला होता.
गेल्या दीड महिन्यात पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या आठ घटना!
गेल्या फक्त दीड महिन्याच्या कालावधीत इंदापूर तालुक्यात दोन, तर पुणे जिल्ह्यात एकूण आठ ठिकाणी लाचखोरीच्या घटना घडल्या. 28 फेब्रुवारी रोजी इंदापुरातील महसूल कर्मचारी महिलेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. 5 मार्च रोजी सिंहगड पोलीस ठाण्यात महापालिकेच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यावर, तर पिंपरी पोलीस ठाण्यात 4 मार्च रोजी महसूल खात्यातल्या मंडलाधिकाऱ्यावर साडेचार लाखांची लाच मागताना व चार लाखांची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली.
आज इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सापळा लावण्यात आला. 10 फेब्रुवारी रोजी बंडगार्डन परिसरात प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून व खाजगीस्मावर एक लाख 60 हजाराची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली. 5 फेब्रुवारी रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात लातूर प्रतिबंधक विभागाने एक गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये सरपंचाच्या पतिविरोधात 16 हजारांची लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली.











