बेळगाव : महान्यूज लाईव्ह
बेळगाव तालुक्यातील कडोलीच्या नागेश चंद्रप्पा देसाई यांची ही कहाणी… एकेकाळी तीन एकर शेतीमध्ये कर्जबाजारी झालेल्या या शेतकऱ्याने कोबीचा प्रयोग केला आणि कोबी त्याला पावला. तो एवढा पावला या शेतकऱ्याचे सगळे आयुष्य बदलून गेले. या कोबीची पुण्याई घरावर रेखाटली, घरातल्या भांड्यावर, फिरायच्या गाडीवर रेखाटली, एवढेच काय तर भावाच्या लग्नाच्या पत्रिकेवर सुद्धा!
नागेश देसाईंची ही कहाणी गेल्या 14 वर्षातली. तीन एकर शेतीत भागेना. ऊस बटाटा आणि भाताने काही हात दिला नाही. कर्ज वाढत गेले. घर कसे चालवायचे त्याची चिंता वाढली. त्याच काळात कमी कालावधीत येणारे पीक म्हणून मित्राने सल्ला दिला की, कोबी लागवड कर! आणि कोबीने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. वर्षात सहा वेळा पीक घेणाऱ्या या शेतकऱ्याची ही कमाल आहे!
कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार ही भाजीपाल्याची पिके कधी कधी शेतकऱ्याला लखपती बनवतात, तर कधी मातीमोल! देसाईंना मात्र कोबी चांगलाच पावला. कोबी नाही एवढे उत्पन्न दिले की कर्ज तर फिटलेच, पण आधीची तीन एकराची शेती पाच एकरांवर पोचली.
कोबीच्या उत्पन्नाबरोबर कोबीची नर्सरी देखील सुरू केली आणि या नर्सरीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देखील मिळाले. घरच्या शेतीसाठीच कोबी लावायला जे रोप 60 पैशात खरेदी करावे लागते ते वीस पैशात तयार होऊ लागले. एकरी साधारणपणे 25 ते 30 टन उत्पादनामुळे कधी भाव कमी झाला, तरीही देसाई यांना मात्र एकरी उत्पन्न चांगले मिळाले.











