ज्ञानेश्वर रायते, बारामती.
शनिवार ८ मार्च.. जागतिक महिला दिनाचा दिवस.. मात्र या दिवशी अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव म्हणत ८० वर्षाच्या अमृताबाला शोरीलाल आहूजा यांनी याच दिवशी जगाचाच निरोप घेतला. कोणीतरी सौभाग्याचे मरण आले म्हणाले.. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आहूजा कुटुंबियांशी स्नेह असलेल्या, बारामतीच्या विकसित प्रवासाचे साक्षीदार असलेले कित्येक जण आले..अमृताबाला यांच्या निधनाने कुटुंबियांच्या डोळ्यातील पाणीही विरत नाही, तोच तिसऱ्या दिवशी सकाळी पती शौरीलाल आहूजा यांनीही जगाचा निरोप घेतला. या घटनेने आहूजा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाच, मात्र पतीच्या हृदयाच्या कोपऱ्यात पत्नीविषयी अतूट नाते, प्रेम, जिव्हाळा किती घट्ट असतो हे या घटनेने दिसून आले. पत्नीच्या निधनाचा विरह असह्य झाल्याने शोरीलाल यांनीही जगाचा निरोप घेतला.
बारामतीतील आहूजा पती-पत्नीच्या या एका दिवसाच्या अंतराने झालेल्या निधनाने अनेकांचे डोळे पाणावले. अमृताबाला शोरीलाल आहूजा यांचे वृध्दापकाळाने ८ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने आहूजा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
आयुष्याच्या अनेक चढउतारात खांद्याला खांदा लावून पाठीशी भक्कम उभ्या राहीलेल्या जोडीदाराने आयुष्याची साथ सोडावी याचा विरह ८५ वर्षीय शोरीलाल यांना सहन झाला नाही. अन जागतिक महामारीच्या काळात कोरोना होऊनही त्यावर भक्कमपणे मात केलेल्या शोरीलाल यांनीही जगण्याची जिद्दच सोडली. १० मार्च रोजी त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
मूळच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील असलेले शोरीलाल आहूजा हे फाळणीच्या काळात पाकिस्तान सोडून भारतात आले. भारतात आल्यानंतर सुरवातीला मिळेल ते काम करून घर जगवण्याचा प्रयत्न केलेल्या शोरीलाल आहूजा यांच्या हातात जादू, तोंडात साखऱ आणि डोक्यावर बर्फ होता.
त्यातूनच बारामतीला कर्मभूमी मानल्यानंतर येथे छोटे हॉटेल सुरू केले. त्याला पंजाब रेस्टॉरंट असे नाव देऊन मनाच्या एका कोपऱ्यात फाळणीच्या आठवणीही ताज्या ठेवल्या. मुले मोठी झाली आणि बारामतीच्या विकासाच्या प्रवासाबरोबर आहूजा परिवारही मोठा झाला. अमृताबाला यांच्या नावाने आहूजा परिवारात उद्योग सुरू झाले. अगदी मागील काही वर्षांपर्यंत सामाजिक क्षेत्रात झोकून दिलेल्या होमगार्ड मध्ये मोठ्या पदावर पोचलेल्या थोरल्या मुलाबरोबरच अमृताबाला, शोरीलाल यांचा सामाजिक व्यासंग मोठा होता. धार्मिक कार्यात शोरीलाल यांचा सहभाग असायचा.
छोट्या हॉटेलपासून सुरू झालेला हा प्रवास हॉटेलिंग, लॉज, शूजच्या बरोबरीने वेगवेगळ्या व्यवसायात रुपांतरीत झाला. विकसित होत गेला. प्रविण, उमेश, संजय व मुलगी अनिता यांना योग्य संस्कार, शिस्त लावण्याचे काम करणाऱ्या शोरीलाल यांचे नाव पुढे या पुढच्या पिढ्यांनी आणखी मोठे केले. त्यांनी विविध व्यवसायांचा अमृता हा बारामतीचा ब्रॅण्ड बनवला.
याच आहूजा परिवारात केवळ दोन दिवसाच्या अंतराने घडलेल्या या घटनेने मात्र बारामतीलाही अस्वस्थ केले. एकीकडे सावडण्याचा विधी व दुसरीकडे अंत्यसंस्कार अशा द्विधा मनस्थितीतील बारामतीकरांच्या डोळ्यात या घटनेने टचकन पाणी आणले. नियतीच्या चालीपुढे कोणाचेच काही चालत नसले, तरी दोघांच्या एकमेकांवरील जिवापाड प्रेमाने त्यांचे विसाव्याचे क्षण अगदी समीप आणून सबंध आयुष्यातही व आयुष्याची साथ सोडतानाही एकत्र वाट चालणाऱ्या या पतीपत्नीचे निधन सर्वांनाच शोकमग्न करून गेले..!











