भोर : महान्यूज लाईव्ह
कामातुरानां न भयं न लज्जा.. असं म्हणतात ते काय उगीच नाही.. बायकोचा प्रियकर अर्ध्या रात्री घरात शिरला. त्याची माहिती नवऱ्याला मिळाली आणि नवराही त्याक्षणी घरात आला. जोराचा वाद झाला. वाद विकोपाला गेला.. बायकोने आणि प्रियकराने हतबल झालेल्या नवऱ्याला चक्क मारून टाकले. एवढेच नाही तर तब्बल 55 किलोमीटर लांब नेऊन टाकले.
या घटनेत सिद्धेश्वर बंडू भिसे याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पुणे सातारा रस्त्यावर सारोळा या ठिकाणी नेऊन नदीमध्ये टाकण्यात आला होता. राजगड पोलिसांनी हा मृतदेह शोधला व सिद्धेश्वर ची बायको योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी सुतार या दोघांना अटक केली. या घटनेने मात्र हडपसर मध्ये खळबळ उडाली.
घटना हडपसर परिसरातील, मात्र राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास घडलेली.. हडपसर येथील योगिता सिद्धेश्वर भिसे हिचे शिवाजी सुतार याच्याशी विवाहबाह्य संबंध होते. शिवाजी सुतार हा अर्ध्या रात्री योगिता हिला भेटण्यासाठी आला होता. त्याची माहिती योगिताचा पती सिद्धेश्वर बंडू भिसे याला मिळाली. त्याने तातडीने घर गाठले. तेव्हा दोघेही घरात आढळून आले.
यावरून वाद सुरू झाला. या वादात योगिता ही शिवाजी सुतारला साथ देत होती. दोघेही सिद्धेश्वर शी भांडू लागले. वाद एवढा विकोपाला गेला की, योगिता व शिवाजी या दोघांनी मिळून सिद्धेश्वर चा खून केला खून करून त्याचा मृतदेह एका पोत्यामध्ये कोंबून तो मृतदेह पुणे सातारा रस्त्यावरील सारोळा गावात नेऊन तेथील नदीत फेकून दिला. दरम्यान पाण्यात फुगून आलेला मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी शर्टाच्या टेलरच्या लोगो वरून मृतदेहाची ओळख पटवली आणि आठ तासात आरोपीला जेरबंद केले.











