निलेश भोंग : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी परिसरात आज सकाळी सहा वाजल्यापासून पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकूळ घातला. जबरदस्त दहशत पसरवत या लांडग्याने तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच गांभीर्याने वनविभागाची रेस्क्यू टीम इंदापूर कडे पोहोचली पण तोपर्यंत पिसाळलेल्या लांडग्याचा खेळ तमाम झाला होता! लांडगा मृतावस्थेत आढळून आला.
या लांडग्याने तीन शेतकऱ्यांना जखमी केले आज सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून हा प्रकार सुरू होता. इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी गावातील ताराबाई शिवाजी धुमाळ, रवींद्र मारुती घाडगे व मच्छिन्द्र शिवराम राजपुरे या तिघांना लांडग्याने जखमी केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शी व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पहिल्यांदा लांडगा ताराबाई धुमाळ यांना चावला. सकाळच्या वेळी घरासमोर आवाराची साफसफाई करत असताना अचानक लांडग्याने ताराबाईंना चावा घेत जखमी केले. लांडगा पिसाळलेला असल्याने वाटेत जो कोणी दिसेल त्याला चावत सुटला. काही अंतरावरच जनावरांचे शेण काढत असलेल्या रवींद्र घाडगे यांना त्याने लक्ष्य केले.
त्यानंतर शेतात पाणी देत असलेल्या राजपुरे यांनाही लांडग्याने चावा घेत जखमी केले. दरम्यान घटना घडतात नागरिक कधी धावत आले तोपर्यंत लांडगा पसार झाला होता या तिघांना बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान या घटनेची माहिती तोपर्यंत नागरिकांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी विलास निकम, वनरक्षक यु.डी. मोरे, लक्ष्मण कुंभार लामजेवाडीत पोहोचले आणि लांडग्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत लांडगा सापडला नव्हता मात्र तीन वाजल्यानंतर हाच लांडगा मृत अवस्थेत आढळून आला. पिसाळलेला असल्याने या लांडग्याचा मृत्यू झाला.
मृत लांडग्याचे शवविच्छेदन निरगुडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ.जगन्नाथ सुरवसे यांनी केले. याचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्युचे खरे कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात आले. दरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ, भीमराव दौंड, प्रवीण धुमाळ, गणेश निगडे, भागवत मुळीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला सहकार्य केले.











