ज्ञानेश्वर रायते, बारामती
गेल्या आठ दहा दिवसापासून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात ज्या बातम्या सुरू होत्या, त्यावरून ‘लयभारी’ कारवाई होणार हे दिसतच होते. त्यातच तुषार खरात यांना वेगवेगळे लोक धमक्या देत होते, तेही सगळ्यांना पाहून, ऐकून माहिती होत होते. त्या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी त्यांना अटक करावी आणि मुंबईतून तिकडे न्यावे हे काही नवीन नाही. जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी बातम्या केल्याबद्दल लयभारी नावाच्या youtube चॅनलच्या पत्रकारावर एक कारवाई करण्यात आली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तब्बल 85 बातम्या दाखवल्या, न्यायालयाचा अवमान केला अशा विविध कारणावरून तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या खेरीज खंडणीची व ॲट्रॉसिटीची देखील केस दाखल करण्यात आली आहे. त्यावरून तुषार खरात यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दहिवडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल, तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या अन्यथा आणखी काही महिला शोधून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेल अशा स्वरूपाची फिर्याद दाखल झाल्यामुळे त्यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार खरात यांना अटक करण्यात आली असून या अटकेमुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अर्थात या प्रकरणावर अद्याप मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दरम्यान या प्रकरणात रोहित पवार यांनी मात्र तुषार खरात यांची बाजू उचलून धरत पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले, पत्रकार हा पत्रकार असतो. तुमच्यातलाच ते एक पत्रकार आहेत. त्यांचा एक छोटा चॅनल आहे. एका महिलेची बाजू त्यांनी लावून धरली. कोरोनाच्या काळात बोगस बिले केल्याचे प्रकरण समोर आणले. मृत व्यक्तीच्या नावाने योजनेचे बिल फुकटात काढून भ्रष्टाचाराचा झालेला प्रकार समोर आणला. धनगर समाजाच्या हडपलेल्या जमिनीच्या विरोधात आवाज उठवणारा तुषार खरात हा ओबीसी समाजातला एक पत्रकार आहे. त्याच्या बाजूला सगळे पत्रकार उभे राहतील ही अपेक्षा! असं रोहित पवार म्हणालेत.
रोहित पवार असेही म्हणाले की, मंत्र्यांविरोधात बोललं की, गुन्हा दाखल होतो. राजकीय व्यक्तीच्या विरोधात बोललं की, लगेच एखाद्याला उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचे. तुषार खरात यांनी मांडलेले मुद्दे सर्व सामान्यांच्या बाजूने आहेत. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत.











