जेजुरी : महान्यूज लाईव्ह
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी देवस्थानने वस्त्र संहिता लागू केली आहे. ही आचारसंहिता आजपासूनच लाग करण्यात आले असून पाश्चिमात्य कपडे, तोकडी कपडे घालून कोणालाही दर्शनासाठी जाता येणार नाही. पुरुष अथवा महिला भाविकांना कमी कपड्यांमध्ये देवळात प्रवेश मिळणार नाही.
जेजुरी देवस्थान ट्रस्टने या संदर्भात नियमावली जाहीर केली असून भारतीय वेशभूषा परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश देणार असल्याचा श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
बर्मुडा शॉर्ट स्कर्ट किंवा फाटक्या जीन्स घालून फॅशन म्हणून वावरणाऱ्यांना श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टने इशारा दिला आहे. अर्थात यासाठी विश्वस्त मंडळाने भाविकांना नम्र आवाहन केले आहे. देशभरात काही महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये सध्या ही नियमावली लागू करण्यात आली आहे. अर्थात जेजुरीच्या श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने ही नियमावली फक्त जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मंदिरासाठी लागू असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.











