मुंबई : महान्यूज लाईव्ह
घटना मुंबईच्या नागपाडा परिसरातील! पाण्याची टाकी साफ करताना चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक कामगार गंभीर असून त्याला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत हसीपल शेख, राजा शेख, जियाऊल्ला शेख व इमांदू शेख या चौघा जणांचा मृत्यू झाला. तर पुरण शेख याच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस या इमारतीच्या तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. ही पाण्याची टाकी साफ करताना तेथील मिथेनच्या वायुने हे कामगार गुदमरले.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या पाच जणांना तातडीने बाहेर काढले. त्यांनी या कामगारांना तातडीने जे जे रुग्णालयात नेले. मात्र त्यातील चार जणांचा मृत्यू झाला, तर एक अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.











