मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कृत्य प्रकरणात वाल्मीक कराड हा निकटवर्तीय असल्याने राजीनामा द्यावा लागला ते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. माझा काहीही संबंध नाही असे धनंजय मुंडे सांगत असले तरी आता पुरवणी दोषारोप पत्रात मिळत असलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांचे पहिले कनेक्शन समोर आल्याचे सांगितले जात आहे.
अवादा कंपनीला जी खंडणी मागण्यात आली, ती धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या कंपनीच्या कार्यालयातूनच मागण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. सुनील शिंदे हे अवादा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आहेत. शिंदे आणि शिवाजी थोपटे या दोघांना वाल्मीक कराडने याच कार्यालयात बोलावून घेतले होते अशी नवी माहिती पुरवणीच्या दोषारोपत्रातून समोर आली असल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असे त्यांचे समर्थक सांगत असले, तरी दोषारोप पत्रात अशा स्वरूपाची मांडणी असेल, तर हे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या पर्यंत पोहोचू शकते. कालच बारामती मध्ये झालेल्या मोर्चाच्या नंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केले आहे की, या एका आमदारामुळे राज्य नासले जात आहे. याला पाठीशी घालू नका.











