पळसदेव ( ता. इंदापूर ) येथील शेतकरी रामदास चव्हाण यांना कलिंगड या फळपिकाने केले लखपती. केवळ २ महिन्यात ५ लाखाचे उत्पन्न घेवून कमविला तीन लाख रुपयांचा नफा !
डॉ. संदेश शहा, इंदापूर
पळसदेव ( ता. इंदापूर ) हद्दीतील काळेवाडी येथील शेतकरी रामदास दगडू चव्हाण यांनी दोन एकर कलिंगड या फळ पिकातून अवघ्या ६० दिवसात पाच लाखाचे उत्पन्न मिळवले. या पिकासाठी त्यांना २ लाख रुपये उत्पादन खर्च आला. हा उत्पादन खर्च वजा जाता त्यांना तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. शेती व्यवसाय परवडत नाही असे म्हणणाऱ्या बांधावरच्या शेतकऱ्यांसमोर त्यांनी आदर्श उभा केला आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पळसदेव हे मोठे पुनर्वसित गाव असून येथील शेतकरी प्रामुख्याने उसाची शेती करतात. परंतु ऊसाची शेती ही आस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकरी पारंपरिक ऊस शेती ऐवजी बाजारात जे विकले जाते, तसेच ज्याचे लगेच पैसे मिळतात ती शेती करू लागले आहे. कोरोना महामारीपासून शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्यात आली आहे. उत्पादित शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आता शेतीमधून फायदा मिळण्यासाठी विविध प्रयोग करत आहेत.
पळसदेव काळेवाडी येथील शेतकरी रामदास दगडू चव्हाण यांनी दोन एकरमध्ये केलेला कलिंगडाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या पिकातून त्यांनी अवघ्या ६० दिवसात पाच लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. दोन लाख रुपये उत्पन्न खर्च वजा जाता, त्यांनी दोन महिन्यात तीन लाख रुपयांचा नफा कमावला आहे. या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबाग लागवड करून केवळ दोन महिन्यात ३ लाखाचा निव्वळ नफा मिळवला आहे.
पळसनाथ कृषी केंद्राचे संचालक राहुल बनसुडे यांच्याशी चर्चा करून त्यांनी कलिंगड या पिकाचा पीक नियोजन आराखडा तयार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या २ एकर शेतातील ऊस कारखान्याकडे गाळपाला गेल्यानंतर पुन्हा ऊस पिकाकडे वळण्यापेक्षा प्रथमच शेतात कलिंगड लागवड केली. शेतात नांगरट, कल्टी व बेड सोडण्यासाठी त्यांनी १७ हजार रुपये खर्च केला. शेतात ६ फूट बाय दीड फुटावर त्यांनी सिम्बा जातीच्या सुमारे १६ हजार कलिंगड रोपाची लागवड केली. त्यांना रोपासाठी १ रुपया ६० पैसे रुपये दराने २५ हजार रुपये रोपांचा खर्च आला.
संपूर्ण पिकाला ठिबक सिंचन व्दारे पाणी दिले. ड्रीप साठी ३७ हजार खर्च करून त्यांनी योग्य वेळी पाण्याचे नियोजन करून पाणी व्यवस्थापन केले. रोप लागवडी पासून दोन महिना खत व औषध याचा खर्च एकुण खर्च दोन लाख रुपये आला. औषधामध्ये त्यांनी तीन वेळा ड्रीचिंग केले. त्यात ड्रायकोडर्मा, वॉटर सोल्युबल खताचा योग्य वापर केला. कलिंगड वाढीच्या अवस्थेत ऑक्साईड व जिवाणू खते वापरली.
रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरले. त्यामुळे पिकाला रोगाचा अधिकचा धोका बसला नाही. त्यांना दोन एकरात सुमारे ५५ टन उत्पन्न निघाले. सध्याच्या उन्हाळ्यात १० रुपये दराने कलिंगडाची त्यांनी थेट विक्री शेतीतूनच व्यापाऱ्याला केली. यामध्ये त्यांना एकूण साडेपाच लाख रुपयाचे उत्पन्न झाले. उत्पादन खर्च वजा जाता सुमारे ३ लाख रुपयांचा त्यांना फायदा झाला. तोही केवळ दोन महिन्यात झाला. त्यामुळे चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलं. एवढी वर्ष ऊसाच्या नादी लागलो, मात्र ऊसापेक्षा फळबागातून शेतकऱ्याची झपाट्याने प्रगती होऊ शकते असा विश्वास शेतकरी श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
त्यांना उत्पन्न घेण्यासाठी पळसनाथ कृषी केंद्राचे राहुल बनसुडे, सोहेल सय्यद यांनी बांधावर जाऊन वेळोवेळी खत,औषधे व रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांना समाधानकारक उत्पन्न घेता आल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. इतर शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या अधिक नादी न लागता फळबागाचे उत्पन्न घेतल्यास नक्कीच याचा फायदा होईल. फळबागांना खर्च होतो, मात्र उत्पन्न कमी वेळेत अधिक मिळते. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रात भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांनी फळबागांचे उत्पन्न घेण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. आता या पिकानंतर पुन्हा लगेच याच बेडवर पुन्हा कलिंगड लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी बेड व ड्रिपचा देखील खर्च कमी होणार असल्याने फायद्यात निश्चित वाढ होईल असे मत यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केले.











