उपेंद्र धोंडे, भूजलतज्ञ
एकिकडे भूजलसाठे कुठे, किती आहेत व आपल्याला ते नेमके किती काळ पुरतील याचा हिशेब नाही आणि दूसरीकडे भुपृष्ठजलसाठे उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे झपाट्याने रिकामे होताना दिसत आहेत.
अभियांत्रिकी ज्ञानाच्या क्षमतेद्वारे भूपृष्ठावरील जलसाठ्यांत वाढ होणे निश्चितच कौतुकास्पद, परंतु खऱ्या अर्थाने जल सुरक्षिततेसाठी भूजल विज्ञानाचा विकासच महत्त्वाचा आहे आणि नेमके भूजल विज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या तीस चाळीस वर्षांच्या जल व्यवस्थापनाचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, आपण भुपृष्ठजलाचे व्यवस्थापन म्हणजेच मुख्य जल व्यवस्थापन मानतोय आणि हेच महाराष्ट्राच्या पाणी टंचाई, दुष्काळस्थितीचे मुख्य कारण होय.
भूजल विज्ञान, भूजल वैज्ञानिकाचे महत्व, सुक्ष्म पाणलोट स्तरावर भूजल साठे नियोजनाचे प्रयत्न, त्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ या गोष्टी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकांच्या ध्यानीमनी तरी आहेत का? जर भूजल पुनर्भरण सारखा विषय, यातील उच्च तांत्रिक क्षमता असणाऱ्या भूजल वैज्ञानिकांना शोधून, त्यांना प्रोत्साहन देऊन, सामान्य माणसाला त्यांचे महत्त्व विशद करून जर सोडवायचा प्रयत्न केला तर दुष्काळमुक्ती अवघड नाही.
परंतु, संपूर्ण भूजलक्षेत्रच जर स्वयंघोषित जल महापुरुष, पूरस्कार -पद-प्रतिष्ठेला हपापलेल्या तथाकथित जलनायक वगैरे आणि पाण्यात पैसा पाहणाऱ्या जल- पर्यावरणजीवी खड्डेखोरांच्या ताब्यात दिले जात असेल, तर अभूतपूर्व पाणीटंचाई, दुष्काळी विनाशापासून महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकत नाही. ईश्वर सद्बुद्धी देवो..!











