युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
सांगली : साउथच्या सिनेमाला लाजवेल अशी ही घटना.. 10 फेब्रुवारीला रत्नागिरी नागपूर महामार्गावर बाबुराव पाटलांचा मृतदेह आढळला. अपघातात बाबुराव पाटलांचे निधन झाले.. सारा मामला असाच होता, पण वीस दिवसानंतर जे समजले, त्याने सांगली जिल्हा हादरला.. नवऱ्याचा खून बायकोने आणि मुलाने मिळून केल्याचे समोर आले आणि पोलीस देखील चक्रावून गेले.
देणेकरी दररोज घरासमोर येतात. रोज पैसे मागतात. त्याने मायलेक वैतागून गेले होते. या जाचातून सुटका मिळेल आणि शिवाय बापाचे विम्याचे पैसे मिळतील या हव्यासापोटी चक्क नवऱ्याचा बायकोने खून केला आणि बापाच्या या खुनात पोरगा देखील सहभागी झाला. सांगली जिल्ह्यातील शिरढोण येथील ही घटना.
बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा मृतदेह 10 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी नागपूर महामार्गावरील लांडगेवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावर आढळून आला होता पोलिसांनी प्राथमिक तपास केला आणि अपघात झाल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी आणखी सखोल तपास केला.. तेव्हा पोलिसांना यामध्ये संशय आला कारण बाबुराव पाटलाची बायको आणि मुलगा यांच्या जबाबात विसंगती येत होती आणि हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. यामध्ये या तिघांपैकी एकाने आपण अपघाताच्या दिवशी कारमध्ये होतो असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तिघांचेही मोबाईलची लोकेशन त्या दिवशी ज्या ठिकाणी पाटील यांचा मृतदेह सापडला त्याच ठिकाणी होते. याखेरीज पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा देखील आधार घेतला. त्यामध्ये घटनेच्या दिवशी बाबुराव पाटील यांच्या मृत्यूनंतर त्याची बायको वनिता, मुलगा तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हे तिघेही एका हॉटेलमध्ये जेवण करताना दिसून आले होते.
पोलिसांच्या संशयाची सुई बाबुराव पाटलांच्या बायकोकडे वळली आणि सारे प्रकरण समोर आले. नवऱ्याच्या विम्याचे पैसे मिळावेत आणि उधारी मागायला येणारे लोक पुन्हा उधारी मागायला येऊ नये यासाठी केलेला हा नियोजनबद्ध कोण होता यामध्ये बाबुराव पाटलाची बायको वनिता पाटील मुलगा तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हुलवान या तिघांनी मिळून हा खून केल्याचे समोर आले आहे.











