ज्ञानेश्वर रायते, बारामती
सातत्याने इलेक्शनच्या मूडमध्ये असलेल्या पक्षाची सत्ता असल्यावर वेगळे काय सांगायला नको.. लाडकी बहीण नंतर राज्यातील महायुतीच्या सरकारने नवीन फंडा शोधला आहे. राज्यातील सगळे समाज खुश करायचे..! पण त्याला सामाजिक असं नाव दिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो.. मग दुर्मिळ वाद्य महोत्सव या नावाखाली सन 2025 हे महोत्सवी वर्ष साजरे केल्या असून कोट्यावधींचा खर्च या वर्षात केला जाणार आहे यासाठी तरतूद देखील मोठी करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक व कला खात्याने हा नवीन फंडा शोधला असून लोकानुनयी राजकारण करण्याच्या नादात हा नवीन महोत्सव साजरा करण्याच्या सूचना वेगवेगळ्या विभागांना देण्यात आले आहेत. विभागवार असलेले सण, महोत्सव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कला यासाठी राज्य सरकार मोठा पैसा मोजणार आहे. त्यासाठी भली मोठी तरतूद देखील करण्यात आली आहे.
सन 2025 हे महोत्सवी वर्ष वर्षभर महोत्सवाच्या कार्यक्रमांना परवानगी दिली असून शासन निर्णय जाहीर केला आहे. महिला वाद्य महोत्सवासाठी 22 लाख 50000 रूपये, असंघटित कलांचा महोत्सव 50 लाख रुपये, लावणी महोत्सव 34 लाख 55 हजार रुपये, पिगुली महोत्सव 22 लाख 85000 रूपये, शाहिरी महोत्सव 24 लाख रुपये
दशावतार महोत्सव 36 लाख 57000 रूपये, नमन महोत्सव 35 लाख 47 हजार रुपये, जलसा महोत्सव 31 लाख 97 हजार रुपये, तमाशा महोत्सव 37 लाख 29000 रूपये, एक भारत श्रेष्ठ भारत 91 लाख 46200 रूपये, भारुड महोत्सव 23 लाख 740 रुपये, विधी नाट्य महोत्सव 22 लाख रुपये,
लोकसंगीत महोत्सव 22 लाख 70000 रूपये, द्रुपद महोत्सव 22 लाख रुपये, वही गायन महोत्सव 26 लाख रुपये, गझल गायिका 22 लाख 50 हजार रुपये, कृषी महोत्सव 23 लाख 35340 रुपये, कोळी महोत्सव 22 लाख 50 हजार रुपये, बोहाडा महोत्सव 22 लाख 75000 रुपये, दुर्मिळ वाद्य महोत्सव 22 लाख रुपये असा खर्च होणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे अप्पर सचिव बाळासाहेब सावंत यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
खिरापती वाटणारे सरकार असाच संदेश योग्य नाही!
ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे पाटील यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अगोदर प्रत्येक समाजाची महामंडळे निर्माण झाली आहेत. त्यानंतर आता समाजानुसार जर महोत्सव साजरे करणार असाल, तर पूर्वीच्या सरकारने ज्याप्रमाणे जातीनिहाय व समाजनिहाय समाज मंदिरे उभारण्याचा फंडा शोधला होता, तसाच प्रकार हा आहे. एक जात किंवा समाज खुश करण्यासाठी अशा स्वरूपाची खिरापत वाटणे कितपत योग्य आहे? सरकार लोकानुनयी राजकारण करत आहे ते योग्य नाही. कला म्हणून एकत्र एखादा महोत्सव करणे समजू शकतो, मात्र हा खिरापत वाटण्यासारखाच प्रकार वाटतो. एखाद्या खात्यामध्ये नवीन मंत्री आला की त्याला नवीन काहीतरी करावेसे वाटते त्यातून आलेला हा निर्णय असावा. प्रत्यक्षात त्या कलेला काय हातभार दिला हे महत्त्वाचे आहे. त्याऐवजी फक्त दिखाऊपणा करणे यासाठी जर पैशाचा वापर केला जाणार असेल तर ते सर्वथा योग्य नाही.











