बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर व फोटो ठेवून स्टेटस ठेवल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार बारामती शहरात एकावर कारवाई करण्यात आली आहे.
बारामती पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने व्हाट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर ठेवल्याचे समजले. या माहितीच्या अनुषंगाने पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यावर गोपनीय माहितीनुसार औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा फोटो व आक्षेपार्ह मजकूर मिळून आला.
या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी त्याच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 127 प्रमाणे प्रस्ताव तयार करून तो अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांना सादर केला. यावर सुनावणी घेऊन सदर इसमाची कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाल्याने, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, त्याने योग्य व लायक जामिनदार न दिल्याचे त्याची १४ दिवसांकरीता रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे करण्यात आली.
बारामती शहर पोलीसांनी बारामती शहरातील वेगवेगळ्या सोशल मीडिया साइडवर, तसेच नागरिक ठेवत असलेल्या व्हाट्सअप स्टेटसवर बारकाईने लक्ष ठेवले असून त्या माध्यमातून कोणत्याही धर्मा विरुद्ध तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर यापुढे देखील उचित कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या छत्रपती संभाजी महाराज बलीदान महिना तसेच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून आगामी काळात हिंदू व मुस्लिम समाजाचे उत्सव येणार असून सदर उत्सवांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह असे स्टेटस किंवा अफवा पसरवणारा संदेश कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने कोणत्याही धर्माविरुद्ध सोशल मीडियावर शेअर करू नये असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी केली..











