डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व नीरा डाव्या कालव्याला दोन आवर्तने देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
१ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
यावेळी खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी १८ फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या २५ एप्रिल पासून दुसऱे आवर्तन देण्यात यावे, अशी आग्रही मागणी मंत्री श्री. भरणे यांनी या बैठकीत केली. ही मागणी लक्षात घेऊन दुसऱे आवर्तन येत्या २५ एप्रिल पासून सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत निरा डावा कालव्यातून इंदापूरच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याचा देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार निरा डाव्या कालव्याला ११ मार्च ते ३ मे या कालावधीत ५४ दिवसाचे उन्हाळी हंगामातील पहिले तर ४ मे ते २६ जून या कालावधीत ५४ दिवसाचे दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन शेती सिंचनासाठी दिले जाणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना आपली उभी पिके संवर्धनासाठी होणार आहे.
यावेळी मंत्री. श्री भरणे यांनी बैठकीत सणसर जोड कालव्याला खडकवासला प्रकल्पाच्या मंजूर पाणी वाटपातील तरतुदीनुसार पाणी सोडणे बंधनकारक असून या सणसर जोड कालव्याला आराखड्यात तरतूद केल्याप्रमाणे पाणी सोडण्यात यावे व ते २२ गावांना शेती सिंचना साठी पाणी देण्यात यावे अशी आग्रही मागणी या बैठकीत केली.
खडकवासला व निरा डावा दोन्ही कालव्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे तसेच जास्तीत जास्त काळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी आवर्तन द्यावे, तसेच तरंगवाडी तलावाच्या पाण्यावर इंदापूर शहर व अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून असल्यामुळे या तलावात पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी या बैठकीत मंत्री श्री. भरणे यांनी केली. यावर पाणी परिस्थिती पाहून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी या बैठकीत दिले.











