डॉ. संदेश शहा, इंदापूर
शिक्षण हे खरे वाघिणीचे दूध असल्याचा प्रत्यय महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक अभियंता पदी निवड झालेल्या सागर पिसे यांच्या खडतर परिस्थितीतील यशस्वी शैक्षणिक प्रवासामुळे दिसून येतो. आता त्याचा जीवनाचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच असतो हे सागर पिसे याने सिद्ध करून दाखवले आहे.
आयबीपीएस द्वारे घेतल्या जाणाऱ्या सहाय्यक अभियंता महापारेषण ( ऊर्जा विभाग ) पदासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये शिवाजीनगर इंदापूर येथील सागर गोविंद पिसे याने बाजी मारल्याने त्याची महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक अभियंता पदी निवड झाली आहे.
अगदी गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या सागर गोविंद पिसे याचे प्राथमिक शिक्षण इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे, विद्यालयीन शिक्षण श्री हनुमान विद्यालय अवसरी तसेच शंभू महादेव विद्यालय दगडवाडी या ठिकाणी झाले असून, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वर्धमान महाविद्यालय वालचंदनगर येथे पूर्ण झाले. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी त्याने इंदापूर शहरा जवळ महामार्गालगत असलेल्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून प्राप्त केली.
वडील गोविंद पिसे आणि आई अनिता पिसे यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवले.
पदवी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी सागर याने पुणे येथे अभ्यास करत स्वतःचा खर्च भागवण्यासाठी झोमॅटो पार्सल बॉय म्हणून काम केले. दिवसभर अभ्यासिकेत अभ्यास करून नंतर झोमॅटोचे पार्सल पुरवण्याचे काम सागर करत होता. निकाल जाहीर झाला, त्या दिवशी रात्री साडेदहा वाजता सागरचा मित्र धावत त्याच्या खोलीवर येऊन त्याला मिठी मारून म्हणाला, सागर सर, तुम्ही साहेब झाले!
त्यांनी लागलेला निकाल त्याला दाखवला. निकालानंतर मात्र सागर च्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने आतापर्यंत केलेले कष्टाचे फळ त्याला मिळाले. प्रतिकूल परिस्थितीची जाणीव, कसलेही आर्थिक पाठबळ नसताना घेतलेले कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर रात्रंदिवस केलेला अभ्यास, आई वडीलांचे कष्ट व आशीर्वाद, गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळे सागर ने आयुष्याची गरुड भरारी घेतली आहे. गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हे यश त्याने प्राप्त केल्यामुळे सागर चे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, गटनेते कैलास कदम, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, माजी नगरसेवक सुनील अरगडे यांनी पिसे याचे अभिनंदन केले.











