दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई शहरातील वाई, सातारा व वाई पुणे या तिकाटण्यात गेली अनेक वर्षांपासून झोपड्या बांधून शेकडो मोलमजूरी करणारी कुटुंबे आहेत. येथे राहणाऱ्यांची ही दुसरी पिढी असल्याचे सांगितले जाते. मात्र ही खाजगी जागा असून संबंधित जमीन मालकाने उच्च न्यायालयातून आदेश आणल्याने येथील या अतिक्रमित जागेवरील शेकडो झोपड्या तोडण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे प्रशासनाने मोहिम हाती घेतली.
दरम्यान भिमनगर जवळ शेकडोंच्या संख्येने प्रशासनाने आणलेला पोलिसांचा ताफा पोलिस गाड्यांमधून उतरविण्यात आला. हे पाहताच येथील रहिवाशांनी बायकापोरांना घेऊन हातात झेंडे घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला. बघता बघता वाई तालुक्यातील शेकडो भिमसैनिक वाईच्या या तिकाटण्यातील भिमनगर वाचविण्यासाठी दाखल झाले .
पण या घटनेचे रुपांतर लाठीचार्जमध्ये होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आरपीआयचे नेते अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड व इतर प्रमुख कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल होवून वाई पोलिस ठाण्यातील परिविक्षाधीन अधिकारी श्याम पानेगावकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल गवळी व इतर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा विषय शांततेच्या मार्गाने मिटावा असा तोडगा काढण्याची विनंती केली.
अतिक्रमण असणाऱ्या गटाची प्रथम मोजणी करुन किती झोपड्या अतिक्रमणात येतात, याची जमीन मालकाने खात्री करावी अशी मागणी केली. पण उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने पोलिस प्रशासनाला देखील यात काही करणे अशक्यच होते. उच्च न्यायालयाचे आदेश पाळणे एवढेच पोलिस प्रशासनाच्या हातात असल्याने प्रशासनाने अतिक्रमणातील झोपड्या तोडण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळावर सज्ज ठेवली होती.
उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जमिनीच्या याचीकीमुळे येथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले असा जमीन मालकांचा दावा आहे. दरम्यान ही जागा कायदेशीर मार्गाने परत मिळवण्यासाठी अनेकदा तडजोडीचे प्रयत्न केले अशी ही माहिती यावेळी देण्यात आली, दुसरीकडे या झोपड्यांसाठी ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विजेची व्यवस्था देखील केली आहे. या सगळ्या विचित्र परिस्थितीमुळे नेमकं काय करायचे हा पेच पोलिसांसमोरही होता. दरम्यान तूर्तास तरी ही कारवाई थांबली, मात्र मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्यासाठी तैनात केलेल्या व्यवस्थेमुळे वाई तालुक्यातील चर्चा झाली.











