बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यात सर्वाधिक ऊस दर देणारा असा नावलौकिक मिळवलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांच्या हजेरी नोंदीमध्ये कारखाना प्रशासनाची फसवणूक करून संपूर्ण विभागाने संगनमत केलं आणि आर्थिक घोटाळा केला. हा घोटाळा उघडकीस आला असून या कारखान्यातील लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेड टाईम कीपर, टाईम कीपर, सर्व लिपिक आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे .
या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी यासंदर्भात माहिती दिली. या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांसह कामगारांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावरही पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सन 2015 ते आज अखेर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद, प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज या सर्वांचे रितसर ऑडिट केले जाणार असून त्याची चौकशी होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या सर्व व्यक्तींवर कठोरपणे कारवाई करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे जगताप यांनी सांगितले.
या संदर्भात जगताप यांनी प्रसिद्धीस पत्र दिले असून सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सर्व क्षेत्रात आघाडीवर असतानाही कारखान्याच्या कामकाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याच घटकाला पाठीशी घातले जाणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालक मंडळास वेळोवेळी केलेल्या सूचनानुसार याचा सखोल तपास केला जाणार आहे. जाणीवपूर्वक कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर होईल व कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी व कामगारांनी कामकाज केल्याचे निदर्शनास आले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलबन केले जाणार असून कायदेशीर मुद्दे विचारात घेऊन कठोर कारवाई केली जाणार आहे असे जगताप यांनी नमूद केले आहे.











