बारामती : महान्यूज लाईव्ह
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातील, महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सुरेंद्र जोंधळे यांच्या भाषणाने या परिषदेचा समारोप झाला. या राज्यस्तरीय परिषदेत विविध विचारवंतांनी मार्गदर्शन केले. मार्क्सवादी अभ्यासक विचारवंत श्री. दत्ता देसाई यांनी ‘मार्क्सवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती’, कोल्हापूरचे ज्येष्ठ विचारवंत डॉ.अशोक चौसाळकर यांनी ‘गांधीवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती या विषयावर, मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार श्री. मधु कांबळे, यांनी ‘आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती’ या विषयावर, कोल्हापूरचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ.प्रकाश पवार यांनी ‘हिंदुत्व विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती’ या विषयावर, तर सोलापूरचे इस्लाम विषयाचे अभ्यासक डॉ. सर्फराज अहमद यांनी ‘इस्लामवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती” या विषयावर मार्गदर्शन केले.
कोल्हापूर येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, यांनी ‘गांधीवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “महात्मा गांधींचा सत्याग्रह हा संपूर्ण जगाला मिळालेली देणगी आहे, त्यांनी भारतीय लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत निर्माण केली, भारताचा स्वातंत्र्य लढा जगातील सर्वात मोठा स्वातंत्र्यलढा आहे, महात्मा गांधींमुळे तिसऱ्या जगातील लोकांना स्वातंत्र्य मिळाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही केवळ भारतीय स्वातंत्र्याची चळवळ नव्हती तर ती तिसऱ्या जगातील सर्व गोरगरिबांची स्वातंत्र्याची चळवळ होती. पश्चिमात्य संस्कृती ही सैतानी संस्कृती आहे. तिने तिसऱ्या जगातील लोकांना गुलाम केले, त्यांचे शोषण केले. आत्मबल म्हणजे काय तर तुमच्या मनाची क्षमता वाढविणे होय . सिद्धपुरुष प्रामाण्य लोकमान्य टिळकांना मान्य होतं तर गांधीजींना ते अजिबात मान्य नव्हते. गांधीजींनी गीतेवर भाष्य केले नाही पण धर्मग्रंथाचे प्रामाणिक मान्य केलं आणि प्रत्येकाला धर्मग्रंथाचा अर्थ लावणे गरजेचे आहे असं म्हटलं आहे, गांधींच्या मते मानवजात वरचेवर अहिंसक बनत चालले आहे आत्मबळाची जाणीव करून घ्यायची असेल तर स्वतःचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे.”
डॉ. प्रकाश पवार मार्गदर्शन करताना म्हणाले, “हिंदू हा शब्द आज परवलीचा झाला आहे, आज प्रत्येक जण अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणून घेतो. पूर्वी लोक स्वतःची जात सांगायचे आज लोक जात सांगण्याऐवजी हिंदू सांगतात, हिंदू स्वतःची ओळख (आयडेंटिटी) खूप गतीने बदलत आहेत, हिंदू आयडेंटिटी व्यावसायिक झाली आहे, जातीय अस्मितेपेक्षा हिंदुत्व अस्मिता प्रखर झाली आहे. रॉयल हिंदुत्व, क्षत्रिय हिंदुत्व व देवाच्या नावाने फिरणारे हिंदुत्व असे आयडेंटिटीचे प्रकार सांगता येतील.
पूर्वी एकाच देवस्थानाला सर्व जातीचे लोक भेट द्यायचे, आता प्रत्येक जातीची वेगवेगळी देवस्थाने निर्माण झाली आहेत. हिंदू लोकांमध्ये आक्रमकता आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय व्यक्ती देवाला जाऊन फोटो काढून, मी हिंदू आहे असे सांगतात. झोपडपट्टीतील गुंडही हिंदू आयडेंटिटी सांगतो. घटनेतील धर्मनिरपेक्षता माझ्या विरोधात आहे असे हिंदूंना वाटू लागले. निवडणूक हिंदू ओळखीच्या आधारे जिंकली जाते की, पैशाच्या आधारे जिंकली जाते हा मात्र संशोधनाचा विषय आहे. केवळ हिंदुत्व ही जादूची काडी नाही, कारण लोक आपले प्रश्न जिथून सुटतील तिकडे जातील.”
मार्क्सवादी अभ्यासक डॉ.दत्ता देसाई यांनी मार्क्सवादाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले ते म्हणाले, बऱ्याच जणांना वाटते की, मार्क्सवादी विचार कालबाह्य झाले आहेत, पण कोणताही विचार कालवाही होत नाही. कोणतीही विचारसरणी कायमस्वरूपी अस्तित्वात नसते आणि कायमस्वरूपी नष्टही होत नाही, जगातील एक तृतीयांश भाग मार्क्सवादी विचारसरणीने व्यापलेला आहे, आज या विचारसरणीचा प्रभाव कमी झालेला आहे पण संपलेली नाही,
भांडवलशाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मार्क्सवाद विचारसरणी विचारसरणीची गरज भासणार आहे, भांडवलशाहीचा वेध घेण्याचं सर्वात चांगलं शस्त्र म्हणजे मार्क्सवाद. भारतातील अनेक नेते, विचारवंत, कामगार-कलाकार, लेखक यांच्यावर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता. भारतातील चित्रपटसृष्टीवर मार्क्सवादी विचारसरणीचा सर्वात जास्त प्रभाव होता. कोणतीही विचारसरणी स्वीकारणे-नाकारणे आपल्या हातात असते पण ती स्वीकारण्या आणि नाकारण्याआधी ती समजून घेतली पाहिजे.”
समारोपाच्या सत्रात मार्क्सवादी अभ्यासक सुरेंद्र जोंधळे यांनी मार्गदर्शन केले, ते म्हणाले, कोणतीही विचारधारा आकाशातून पडत नाही ती काळाची गरज असते, त्यातून ती निर्माण होते. विशिष्ट पोकळी निर्माण झाली की एखादी विचारधारा निर्माण होते आणि ती पोकळी संपली कि ती विचारधारा बाजूला होते पण पूर्णपणे कालबाह्य होत नाही. आवश्यकता भासल्यास काहीसा बदल करून पुन्हा ती विचारधारा स्वीकारता येते. आपल्या देशाने गांधी विचारधारा, आंबेडकरवादी विचारधारा, हिंदू विचारधारा, मार्क्सवादी विचारधारा, इस्लामवादी विचारधारा या सर्व आपापल्या परीने स्वीकारल्या आहेत, त्यामुळे एक विचारधारा चांगली आणि दुसरी वाईट असे आपल्याला सांगता येत नाही, सर्व विचारधारा आपल्या जागी योग्य असतात”
शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, उपप्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. परिमिती जाधव, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.राजकुमार सुरवसे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ. सुरवसे यांनी मानले.











