डॉ. संदेश शहा, इंदापूर
लोणी देवकर येथील पंचतारांकीत औद्योगिक वसाहती मध्ये ज्या भूमिपुत्र शेतकऱ्याच्या जमिनीवर कंपनी उभी राहिली, त्या भूमीपुत्र शेतकरी कुटुंबियांच्या उपजिविकेचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीतील वॉलमॉन्ट स्ट्रक्चर कंपनीच्या समोर धरणे आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्याची कंपनी व्यवस्थापनाने साधी दखल ही घेतली नाही.
अरुण नाथसाहेब होळकर ( रा. बळपुडी, ता. इंदापूर ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी होळकर यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या एकूण ३० एकर जमिनीपैकी तब्बल २१ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी संपादित झाली. त्यांना जमीन संपादनाचा तुटपुंजा मोबदला मिळाला. उरलेल्या नऊ एकर जमिनी पैकी अडीच एकर जमीन पोटखराब निघाली.
अडीच एकर जमीन खडकवासला कालव्याच्या लोणी देवकर बळपुडी शाखेसाठी वापरात आली. सहा ते सात जणांचे कुटुंब, उरलेल्या क्षेत्रात गुंठेवारीने हंगामी पिके घेत आहे. त्यामध्ये उपजिविका होत नाही. कुटुंबातील तीन सुशिक्षित मुलांना नोकरी नाही. त्यांच्या संपादित २१ एकर जमिनीवर उभारलेल्या वॉलमॉन्ट स्ट्रक्चर कंपनीने आपल्या कुटुंबातील दोघांना नोकरीवर घ्यावे तसेच आपणास ठेकेदारीची कामे द्यावीत अशी होळकर यांची मागणी आहे. गेल्या वर्षभरा पासून ते मागणीचा पाठपुरावा करत असून कंपनीने मात्र त्यांना वाटण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
त्यामुळे पूर्वसूचना देवून २० फेब्रुवारीपासून होळकर यांनी कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवस उलटून गेले तरी कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या आंदोलनाची कसलीही दखल घेतली नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्टा करारांतर्गत वॉलमॉन्ट स्ट्रक्चर कंपनीने लोणी देवकर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात कायदेशीर रित्या जमीन संपादित केली आहे. होळकर यांच्या पुतण्याला गुणवत्ता व पात्रतेवर कंपनीत नोकरी देण्यात आली आहे. याउपर रोजगाराची कोणती ही मागणी असमर्थनीय व अनुज्ञेय आहे असे कायदेशीर उत्तर कंपनीच्या वतीने देण्यात येत आहे.
दरम्यान वॉलमॉन्ट कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार न देता परप्रांतीय कामगारांना जाणीवपूर्वक कामावर ठेवले जाते. स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. ज्या शेतकरी भूमिपुत्रांनी या वसाहतीसाठी जमिनी दिल्या, त्यांची कंपनीकडून कायम उपेक्षा होत आहे. आमच्या न्याय आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसे नेते राज ठाकरे यांना साकडे घालणार असल्याचे आंदोलनकर्ते अरुण होळकर यांनी सांगितले.











