इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरच्या सरडेवाडी टोल नाक्याजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत व झालेल्या घटनेत दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. छेडछाडीची धमकी देत या महिलांनी एका टेम्पो चालकाला अडीच लाखाला लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन चालकाने केलेल्या आरडाओरडा नंतर स्थानिकांनी या महिलांना पकडले आणि त्यांच्याकडून पोलिसांनी अडीच लाख रुपये हस्तगत केले.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोरवंची गावच्या राणी सिकंदर शिंदे व स्वाती वसंत शिंदे या दोन महिलांना पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरताज चांद सय्यद हा टेम्पो चालक तळेगाव दाभाडे नजीकच्या सोमाटणे फाटा येथील असून तो त्याचा टेम्पो घेऊन तळेगाव दाभाडे कडे निघाला होता. या दोन महिलांनी त्याच्याकडे लिफ्ट मागितली. त्याने गाडी थांबवून त्या महिलांना लिफ्ट दिली. तो या महिलांना आपल्या वाहनातून घेऊन निघाला होता. सरडेवाडी टोल नाक्याच्या जवळ टेम्पो आला, तेव्हा या महिलांनी टेम्पो चालकाला दरडावून विचारणा केली.
आता तुझ्या खिशात जे पैसे असतील ते टाक, नाहीतर तू आमची छेडछाड केली अशी तक्रार करू अशी धमकी या महिलांनी दिली. त्यावरून चालकाने वाहन थांबवले. या महिलांनी वाहनचालकाला धक्का देत कप्प्यातील अडीच लाख रुपये घेऊन त्या गाडीतून उतरून पळू लागल्या. वाहन चालकही उतरून त्यांच्या मागे धावत इतर लोकांना आरडाओरडा मदतीसाठी हाक मारू लागला.
स्थानिक लोक धावत आले आणि त्यांनी या दोन्ही महिलांना पकडले. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यावेळी एका महिलेच्या काखेतून काळ्या रंगाच्या पर्स मधून दोन लाख 50 हजार रुपये निघाले. पोलिसांनी ही रक्कम हस्तगत करून दोन्ही महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











