संदीप मापारी पाटील, बुलढाणा
चोरून लावलेली खसखशीची झाडे आता येत्या काही दिवसातच त्या शेतकऱ्याला तब्बल तीन कोटींचे उत्पन्न देणार होती.. पण नियतीलाच ते तीन कोटी मान्य नसावेत.. पोलिसांना खबर गेली आणि तीन कोटीचे झिरो झाले.. पोलीस हिरो झाले.. आणि शेतकरी गजाआड झाले.. ही कहाणी आहे बुलढाणा जिल्ह्यातील.. पहिल्या वहिल्या अफूच्या शेतीची!
इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात पोलिसांनी तब्बल 27 लाख 56 हजार रुपयांची अफूची झाडे पकडली तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा तालुक्याच्या हद्दीत तब्बल तीन कोटी रुपयांची अफूची शेती पोलिसांनी पकडली आहे. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अफूची शेती करताना शेतकऱ्यांना पकडले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेतकऱ्याने ही अफूची शेती केली होती. बुलढाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदार मार्फत याची माहिती मिळाली त्यावरून विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या पथकांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संतोष सानप या शेतकऱ्याच्या शेतात धाड टाकली आणि तब्बल तीन कोटीची अफूची झाडे जप्त केली.











