सावंतवाडी : महान्यूज लाईव्ह
वरील वक्तव्य महाराष्ट्रातील एका मंत्र्याचे आहे. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग मध्ये बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपण दबाव टाकतो, दबाव घेत नाही. सगळा विषय क्लियर आहे. भाजप वाढला पाहिजे एवढीच भूमिका आहे. त्यामुळे मी सरपंचांची यादी घेऊन बसणार आहे. एकदम क्लिअर आहे, भाजपच्या गावात शंभर टक्के निधी; उद्धव ठाकरे यांच्या सरपंचाच्या गावात शून्य टक्के निधी! बसा बोंबलत असे ते म्हणाले आहेत.
यापूर्वी देखील त्यांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते. आता ते म्हणाले आहेत की, सगळे लाभ भाजपच्या माध्यमातून भेटत आहेत तर दुसरीकडे जाण्याची गरज काय? देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी हे दिवस-रात्र काम करत आहेत. मोदी देशाला महासत्ता बनवण्याचे काम करत आहेत. आता सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगतो. उबाठाच्या आणि महाविकास आघाडीच्या गावांना टार्गेट करा. त्यांना सांगा तुम्हाला एक रुपयाचा विकास निधी मिळणार नाही. चला गाडीत बसा. पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा. सावंतवाडीच्या मतदारसंघात 100% गावागावात भाजप असला पाहिजे.
पुढे ते असेही म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या काळात काय घडलं? त्यांनी काय वेगळं केलं? आम्ही विरोधी पक्षात होतो. देवेंद्र फडणवीस यांना अटक करेपर्यंत यांची हिम्मत झाली. महाविकास आघाडीच्या काळात कणकवली विधानसभेची आम्ही यादी पाठवायचो, तेव्हा ८० ते ९० टक्के यादी बदलून ते द्यायचे. कामे द्यायचे नाहीत. पदे द्यायची नाहीत. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती द्यायचे. आता तेच औषध आम्ही तुम्हाला पाजतो, तेव्हा का दुखते?











