छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
वाळू माफियांना केवढा माज आला आहे याचा प्रत्यय जाफराबाद तालुक्यातील पासवडी चांडोळ या पुलाशेजारी पुलाच्या कामासाठी राहत असलेल्या मजुरांच्या सामूहिक मृत्यूमुळे आला आहे. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजुरांचे एक अख्खे कुटुंब या वाळू टिपरने संपले.
याची हकीकत अशी जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ या रस्त्यावर पुलाचे काम सुरू असून या पुलाच्या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर काम करत आहेत. या पुलाच्या पासून काही अंतरावरच पत्र्याचे शेड करून हे मजूर राहत होते. रात्रीच्या अंधारात चोरीची वाळू आणून डंपर चालकाने ती मजूर झोपलेल्या पत्र्याच्या समोरच रिकामी केली.
आता हे या चालकाला माहित नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल, मात्र या शेडवरती वाळू रिकामी केल्याने या वाळूखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला. घाईगडबडीत हायवा डंपर खाली केल्याचे सांगितले जात असले, तरी दररोज वाळू वाहतूक करणाऱ्यांना या ठिकाणी शेड आहे आणि मजूर राहतात हे माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल.
मात्र अवैध वाळू वाहतुकीच्या पैशाच्या माजातून पाच निष्पाप जीव जग सोडून गेले. या घटनेमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय 40 वर्ष), सुनील समाधान सपकाळ (वय 20 वर्ष), भूषण गणेश धनवई (वय 16 वर्ष) राजेंद्र दगडूबा वाघ (वय 40 वर्षे रा. दहिद ता. बुलढाणा) व सुपडू आहेर (वय 38 वर्ष रा. तोंडापूर ता. जामनेर जि. जळगाव) या पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक होते.
शेडच्या समोरच्या खोलीत झोपलेल्या एका महिलेमुळे हा प्रकार लक्षात आला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. डंपर चालक तिथून पळून गेला होता. या महिलेने परिसरातील गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले. त्यांनी वाळू बाजूला केली आणि पाच जणांना बाहेर काढले, मात्र त्यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. मुलीला मात्र वाचण्यात गावकऱ्यांना यश आले. पहाटे साडेतीन वाजताची ही घटना होती.











