स्वीय सहाय्यक असणं ही अलीकडच्या काळातील एकदम आवश्यक बाब बनली आहे.. अगदी नगरसेवक किंवा सरपंच सुद्धा स्वीय सहायक बाळगतो. मात्र आमदार खासदारांच्या पीए बाबतीत अनेकदा स्वीय सहाय्यक बदलले जातात असे दिसते. अगदी पाच पाच वर्षाला नवीन नवीन पीए दिसतात. मात्र शरद पवारांचे पीए म्हणून तुकाराम धुमाळी यांनी तब्बल 53 वर्ष काम केले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते शरद पवार यांचे पीए म्हणून काम करत होते.
तुकाराम धुवाळी यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे. याच विषयावरून शरद पवार यांनी एक पोस्ट त्यांच्या ट्विटरवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देणाऱ्या तुकाराम धुवाळी यांच्या बद्दल मत व्यक्त केले आहे.
ट्विटर वरील ट्विटवर शरद पवार म्हणालेत, मी १९७२ पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. आणि हि जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसंच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय.
आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो.











