ज्ञानेश्वर रायते, बारामती.
बारामतीच्या वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे यांची एक पोस्ट सोशल मिडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत बारामतीतील वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटना त्यांची काहीशी कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.. कोणाचे कार्यक्रम आयोजित करायचे, त्यावरूनही बरीच विचित्र स्थिती निर्माण झाली होती. साहजिकच कोणत्याच राजकीय व्यक्ती अथवा पक्षाविषयी कोणतीही चर्चा करण्यापासून अनेक धोरणी लोक दूर राहिले.
आता तो मुद्दा घ्यायचे कारण म्हणजे, बारामतीच्या न्यायव्यवस्थेसाठी एक चांगली खुशखबर मिळाली आहे. एरव्ही राजकीय व्यक्तींच्या किंवा पक्षाच्या कोणत्याही पोस्ट मी आजवर कधी केल्या नाहीत, मात्र एक अत्यंत चांगले काम आणि अत्यंत वेगाने झाले असे म्हणत बारामतीच्या वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र तोंड भरून कौतुक केले आहे आणि त्याला कारणही असेच आहे.. अगदी कमी वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम झाल्याने हेच वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, फास्ट, फॉरवर्डेड आणि ग्यारंटेड काम म्हणजे अजित दादा!
बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मोठी इमारत आहे, मात्र काही महिन्यांपूर्वी दौंडमध्ये नव्याने स्वतंत्र सत्र न्यायालय झाले. इंदापूरलाही सत्र न्यायालयाची मंजुरी मिळाली आणि कामकाजाही नुकतेच सुरू झाले. त्यामुळे बारामतीतील न्यायालयातील यापूर्वीचे व्यस्त असलेले कामकाज कमी झाले आहे. गेल्या काही वर्षात बारामतीत मोठ्या प्रमाणावर वकिलांची संख्या निर्माण झाली. त्याचबरोबर तीन तालुक्यांची वेगवेगळे दावे, खटले, अपिल आणि सुनावण्या या ठिकाणी होत असल्याने मोठी गर्दी होत होती. आता येथील काम कमी झाले आहे.
अशावेळी बारामतीमध्ये जिल्हा किंवा राज्य स्तरावरील इतर प्राधिकरणांची न्यायालय येण्याची गरज आहे. जेणेकरून तीन-चार तालुक्यातील नागरिकांचा एरव्ही होणारा दूर अंतरावरील हेलपाटा वाचू शकतो, तसेच इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या पुणे शहरापासून दूर अंतरावर असलेल्या तालुक्यांना दिलासा मिळू शकतो. यामध्ये सहकार प्राधिकरण, कामगार न्यायालय, संस्थात्मक न्यायालय, अपघात प्राधिकरण त्याचबरोबर इतरही प्राधिकरणांची न्यायालये आवश्यक आहेत. या संदर्भातील मागणी वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे यांनी अजित पवारांच्या कानावर घातली आणि अवघ्या पाच आठवड्यातच सारी प्रक्रिया पार पडली.
त्याचे झाले असे, 11 जानेवारी 2025 रोजी बारामती शहरातील इम्पेरियल लॉन्स या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आले होते. यावेळी प्रभाकर बर्डे यांनी अजित पवार यांना बारामती न्यायालयाची नवीन इमारत प्रस्तावित असून याची मंजुरी लवकर मिळावी अशी मागणी केली आणि तशा स्वरूपाचे पत्र दिले. यानंतर अजित पवार मुंबईला गेले, मात्र त्यांच्या स्वीय सहायकांचा पाठपुरावा सुरू झाला. अवघ्या काही दिवसात नवीन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात पोहोचला आणि 18 फेब्रुवारी रोजी म्हणजे काल अगदी पाच आठवड्यात नऊ मजली इमारतीचे व 72 कोटींच्या खर्चाचे नवीन इमारतीचे प्रस्ताव मंजूर झाले.











