बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत 70 फूट खोल विहिरीत अचानक एक कुत्रा पडला… तीन दिवस विहिरीत पडलेल्या या कुत्र्याला टीम रेस्क्यू बारामती आणि बारामती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवदान दिले.
ही घटना बारामतीतील अशोक नगर परिसरातील वाघोलीकर पार्क येथील असून या ठिकाणी एक विहीर आहे. या विहिरीची कडा लोखंडी तारेने पूर्ण पॅक करण्यात आली आहे मात्र एक थोडी जागा शिल्लक होती त्या ठिकाणाहून या विहिरीत अचानक एक कुत्रा पडला. विहीर तब्बल 70 फूट खोल असून त्यात पाणीही आहे.
कुत्रा विहिरीत पडल्यानंतर तो जीवाच्या आकांताने मदतीसाठी भुंकू लागला. रस्त्याने ये जा करणाऱ्यांच्या काही जणांच्या लक्षात आले मात्र कुत्र्याला काढायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. हा कुत्रा जिवंत राहावा व त्याला येथून सुखरूप काळेपर्यंत भूक भागावी यासाठी वरून चपाती व पाव टाकले जात होते. अखेर याची माहिती बारामतीच्या नगरपालिकेला आणि वन्य प्राण्यांविषयी व पक्षांविषयी काम करणाऱ्या तीन रेस्क्यू बारामती या संस्थेला कळवण्यात आली.
या संस्थेचे श्रेयस कांबळे, अभिलाष बनसोडे, अभिजीत धोत्रे, अक्षय गांधी त्यांच्यासह बारामती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे आग प्रतिबंधक उपकरणांचे पर्यवेक्षक निखिल कागडा, वाहन चालक योगेश सोनवणे, मदतनीस प्रज्वल आहीवळे हे सगळेजण त्या ठिकाणी पोचले. यावेळी राहुल वाघोलीकर, स्वरूप वाघोलीकर, श्री जगताप हेही त्या ठिकाणी उपस्थित होते.
या सर्वांनी विहिरीची एका ठिकाणावरची जाळी कापून रॅपलिंग किटच्या साह्याने रेस्क्यू टीमचे सदस्य खाली उतरले आणि एक तासाच्या प्रयत्नानंतर कुत्र्याला बाहेर काढण्यात आले. दरम्यान वरून कुत्रा पडूनही त्याला कुठलीही जखम झाली नसल्याने याच परिसरात त्याला सोडून देण्यात आले.











