विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रयत भवन कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. आता त्या ठिकाणी भव्य शेतकरी मॉल बांधण्यात येणार आहे. रयत भवन कार्यालय लग्नकार्य व इतर कार्यक्रम यासाठी सुमारे ४५ वर्षापासून बारामतीकर व आसपासच्या तालुक्यात प्रसिद्ध होते.
या कार्यालयाची उभारणी १९९० मध्ये करण्यात आली होती. या इमारतीचा वापर लग्नकार्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करण्यासाठी या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. बारामती शहरात १९९० च्या वेळी महावीर भवन, सांस्कृतिक केंद्र, विरशैव कार्यालय अशी मोजकीच कार्यालय होती. बाजार समितीचे कार्यालय असावे व त्याचा उपयोग शेतक-यांसाठी व इतर लोकांना व्हावा या उद्देशाने त्यावेळीचे संचालक मंडळाने मंगल कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता.
रयतभवन हे नाव देऊन शेतक-यांच्या मुली-मुलांचे विवाह व इतर कार्यक्रमासाठी या अल्प व योग्य दरात मंगल कार्यालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यावेळी सर्वांसाठी अल्पदरात बुकींग देऊन लग्न कार्यासाठी संपुर्ण सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याचा फायदा बारामतीसह आसपासच्या जिल्ह्यातील ग्रामीण लोकांना झाला. तेव्हापासून लग्न कार्यासाठी चांगली सोय झाली.
समितीचे आवारात रयतभवनची प्रशस्त इमारत व पार्कींग, पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा असलेली तसेच व-हाडी आणि वधु व वरांसाठी स्वंतत्र खोल्यांची सोय झाल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यातून रयत भवनची लोकप्रियता वाढत गेली. रयतभवनचा नावलौकीक संपूर्ण पुणे जिल्ह्यात झाला होता. रयतभवन ला वर्षाकाठी साधारणपणे १०० लग्न कार्य होऊ लागली. त्याच बरोबर रयतभवनचा वापर फक्त लग्न कार्यासाठी नाही, तर शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी सहलीची राहण्याची सोय तसेच सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रम,शेतक-यां करिता चर्चासत्र, मेळावे, धान्य व आंबा महोत्सव, रेशीम उत्पादक शेतक-यांसाठी कार्यशाळा व मेळावे इत्यादी कार्यक्रमा साठी होऊ लागला.
सुरूवातीला रयतभवन साठी फक्त २१०० रूपये असे भाडे होते. त्यानंतर वाढ करून सध्या २५००० रूपये असे भाडे आकारले जात होते. त्यामुळे रयतभवनची सुविधा उपलब्ध होती. बारामती शहाराचा विकास पाहता शहरी भागात व तालुक्यातील ग्रामीण भागात विविध आकर्षक व अत्याधुनिक मंगल कार्यालय सुरू झाली.
बारामतीचा विकास झपाट्याने झाल्यानंतर खाजगी कार्यालयाबरोबर स्पर्धा होऊन लागल्याने बाजार समितीचे जुने कार्यालय असल्याने बुकींग दिवसेंदिवस कमी होत गेले, तसेच इमारतीस साधारण ४५ वर्षे झाली व इमारत जुनी झाल्याने सन २०२४ मध्ये संचालक मंडळाने यावर चर्चा करून रयतभवन इमारत दुरूस्तीसाठी खर्च करणे ऐवजी सदर इमारत पाडून त्याठिकाणी शेतकरी मॉल उभारणेचा निर्णय घेतला.
याच रयतभवनच्या ठिकाणी नवीन शेतकरी मॉल उभारण्यात येणार असुन त्यामध्ये व्यवसायिकांना गाळे, हॉस्पीटल, बँक, मॉल, रेस्टॉरंट, जिम यांचे साठी जागा तसेच इतर ऑफीसेस, शेतकरी निवास या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शेतकरी मॉल इमारत कर्मशिअल बांधून समितीस उत्पन्नाचे साधन तयार होणार असून विविध प्रकारच्या व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे. रयतभवन च्या जागेवर लवकरच कर्मशिअल शेतकरी मॉल बारामतीकरांसाठी होणार आहे. लवकरच नवीन मॉलचे बुकींग घेणार असल्याची माहिती सभापती विश्वास आटोळे, उपसभापती रामचंद्र खलाटे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली.











