शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेली बारामती हाफ मॅरेथॉन यंदा येत्या रविवारी होणार आहे. ऑलिंपिक पदक विजेते बॉक्सर विजेंदरसिंह या मॅरेथॉन साठी उपस्थित राहून खासदार सुप्रिया सुळे व विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
बारामतीत रविवारी हा हाफ मॅरेथॉनचा थरार होणार असून या स्पर्धेत परदेशातील दहा स्पर्धकही सहभागी होणार आहेत. एकंदरीत 5000 स्पर्धकांपेक्षा अधिक स्पर्धक यावेळच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेणार असल्याची माहिती शरयू फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी दिली.
योगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून शरयु फाऊंडेशन व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत हाफ मॅरेथॉन सुरू झाली. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून रेल्वे स्टेशन समोरील एमईएस हायस्कूलच्या प्रांगणातून रविवारी (दि. १६ फेब्रुवारीला) मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये यावेळी 21 किलोमीटर 10 किलोमीटर तीन किलोमीटर तसेच फन रन व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी मॅरेथॉन देखील असणार आहे तर यावर्षी पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग स्पर्धकांसाठी देखील वॉकेथॉन होणार आहे.
२१ किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता सुरू होणार असून १० किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी सव्वा सहा वाजता, तर फनरन सकाळी आठ वाजता होणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला वॉकेथॉन सकाळी ८.३० वाजता होणार आहे.











